मनमाड : यंदा मार्चच्या अखेरीस मनमाडकरांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात मृतसाठा आहे. जेमतेम आठ ते १० दिवस तो पुरेल. पालखेड धरणातील आवर्तनाचे पाणी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च अखेरीस मनमाडकरांवर तीव्र पाणी टंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता आहे.

सुमारे ११० दशलक्ष घनफूट साठवणूक क्षमतेच्या मनमाड येथील वागदर्डी धरणात व त्याच्याशी संलग्न १६ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या पालखेड साठवणूक तलावात सध्या मृत जलसाठा शिल्लक असून अनेकदा मनमाडकरांना गढूळ पाणी नळाद्वारे येत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण सध्या शासकीय व खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. शहराला सध्या २२ ते २४ दिवसाआड एक वेळ अनियमित आणि अशुध्द असा पाणी पुरवठा सुरू आहे. त्यातच वागदर्डी धरणांतून शुध्दीकरण केंद्रात पाणी उचलणारे आठपैकी निम्मे वीज पंप बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे धरणातून गुरूत्वाकर्षणाने केंद्रात पाणी घेऊन ते शुध्द करून त्याचा पुरवठा शहरास करण्यासाठी सात ते आठ तासांचा वेळ लागत आहे. असे असतांनाही सध्याचा मृतसाठा जेमतेम ३१ मार्चपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मनमाडकरांची भिस्त पूर्णपणे आता मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात सुटणाऱ्या पालखेडच्या आवर्तनावर आहे.

हेही वाचा…नाशिकमध्ये अमराठी व्यावसायिकांकडून मराठी युवकांची कोंडी, दुकाने बंद राहिल्याने भ्रमणध्वनी दुरुस्तीचे काम ठप्प

पालखेडचे आवर्तन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सात ते आठ तारखेच्या दरम्यान सोडण्याचे नियोजन होते. परंतु, मनमाड शहरासह मनमाड रेल्वे तसेच येवला व परिसरातील खेड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई भासू लागल्याने आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी मोठा दबाव वरीष्ठ राजकीय पातळीवरून सुरू आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भीषण परिस्थिती उद्भवल्याने जिल्हाधिकारी, पालखेड धरण समुहाचे अभियंता व जिल्ह्यांतील आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे पालखेडचे आवर्तन काही दिवस आधी म्हणजे ३० मार्चच्या दरम्यान सुटण्याची शक्यता आहे.

पूर्वतयारी म्हणून सध्या पालखेड धरण समुहांतील करंजवण धरणातील पाणी पालखेड धरणांत सोडून घेण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होताच पालखेड धरणांतून कालव्याद्वारे आवर्तन सोडण्यात येऊन ते शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा साठवणूक तलावात तसेच येवला येथील तलावात दोन दिवसांत पोहचू शकते. त्यातून पुढील दोन दिवसांत म्हणजे दोन एप्रिलपर्यंत शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. हे पाणी सध्याच्या वितरण व्यवस्थेत शहराला जेमतेम ६० दिवस म्हणजे मे महिना अखेर पुरू शकते.

हेही वाचा…नाशिक : वणवे रोखण्यासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष

पालखेडचे आवर्तन तातडीने सोडण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पालखेड धरण समुहाचे अभियंता यांच्याकडे २० दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. – शेषराव चौधरी (प्रशासक तथा मुख्याधिकारी, मनमाड नगरपालिका)

मनमाड शहराची तीव्र पाणी टंचाई राज्य शासन तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्यामुळे पालखेडचे आवर्तन मार्च अखेरीस सुटण्याची शक्यता आहे. – आमदार सुहास कांदे (शिवसेना)