नाशिक : जुन्या निवृत्ती वेतनासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी, जिल्हा परिषद-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी गुरुवारपासून पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी महसूलसह अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पसरला. संपात राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्यामुळे शासकीय कोषागारातील ५० ते ६० कोटींची उलाढाल थंडावली. महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करणे, विविध विभागातील चार लाख रिक्त पदे सरळसेवेने भरती करणे, चतुर्थश्रेणी, वाहन चालक कर्मचाऱ्यांच्या पद भरतीवरील निर्बंध हटवणे, अनुकंपा तत्वावर विनाशर्त नियुक्ती आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारापासून ते कोतवालापर्यंतचे कर्मचारी संपात उतरल्याने महसूल विभागाचे दैनंदिन कामकाज पूर्णत: विस्कळीत झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. काही प्रमुख अधिकारी कार्यालयात होते. पण कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला. काहीवेळा तर अधिकाऱ्यांनाच फाईल वरिष्ठांकडे नेण्याची वेळ आली. संपाची पूर्वकल्पना नसल्याने वेगवेगळ्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

हेही वाचा : नाशिक : संपाचा रुग्णालयांमधील कामकाजावर परिणाम, प्रशिक्षणार्थी परिचारिकांकडून आरोग्य सेवा

महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रवेशव्दारावर निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश वाघ, जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुषार नागरे, जीवन आहेर, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे ज्ञानेश्वर कासार, अधिकारी महासंघाचे पंकज पवार आदी उपस्थित होते. महसूल विभागातील जवळपास एक हजारहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले. संपाची झळ जिल्हा परिषदेतील कामकाजास बसली. यादिवशी केवळ कंत्राटी कर्मचारी कामावर होते.

मनपात काळ्या फिती लावून कामकाज

प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय घेतला जात नसल्याने मनपातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष तथा ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.

हेही वाचा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यासाठी साकडे, भाजप आमदारांची उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोषागारातील ६० कोटींची उलाढाल थंडावली

संपात महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागरे कर्मचारी संघटनाही सहभागी झाली. या विभागाचे राजपत्रित अधिकारी एक दिवस संपात सहभागी झाल्यामुळे शासकीय कोषागार कार्यालयातील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. कोषागारातून निवृत्ती वेतन, शासकीय कामांची देयके वितरण, शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे जिल्हा परिषद, आदिवासी व आरोग्य विभागाला वाटप, आदी कामे केली जातात. दिवसभरात ५० ते ६० कोटींची उलाढाल होत असते. ती पूर्णत: ठप्प झाली. संघटनेचे अध्यक्ष संदीप पवार, सचिव कल्पक कर्डक, उपाध्यक्ष हेमा धोकट, मंगेश वालझाडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.