मालेगाव : आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ येथील सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास तासभर चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जमून लाठीहल्ल्याचा निषेध केला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावरील मनमाड चौफुलीजवळ हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा : पदे १०३८, अर्ज ६४ हजारहून अधिक; निम्मे ग्रामसेवक, आरोग्य सेवक पदांसाठी इच्छुक, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा कोणत्याच सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. तेव्हा यासंदर्भात सरकारने आता तत्काळ ठोस निर्णय घ्यावा तसेच लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे, बाजार समितीचे माजी सभापती बंडू बच्छाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, मर्चंट बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, सकल मराठा क्रांती मोर्चाचे अनिल पाटील, निंबा निकम, भरत पाटील आदी उपस्थित होते.