नाशिक – सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शहरासह औद्योगिक वसाहतीतील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि त्यात साचणाऱ्या पाण्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. सलग दीड महिन्यांपासून होणाऱ्या पावसाने डांबरीकरणातून रस्ता दुरुस्ती वा खड्डे बुजवण्याचे काम पुढे सरकले नाही. त्यामुळे तात्पुरत्या मलमपट्टीचा मार्ग अवलंबला गेला. तथापि, या पद्धतीने बुजविलेले खड्डेही पावसात उघडे पडत आहेत. या स्थितीत खड्डेमय नाशिकचे चित्र कायम असून रस्त्यांची बिकट स्थिती वाहतूक कोंडीला हातभार लावत असल्याचे चित्र आहे.
एरवी चकचकीत दिसणारे रस्ते पावसाळ्यात पूर्णत: बदलतात. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत मनपाच्या सर्वेक्षणात शहरात १० हजार खड्डे असल्याचे उघड झाले होते. मार्चपर्यंत ते बुजविण्याचे काम होणे अपेक्षित होते. काही प्रमाणात ते झाले. काहीअंशी बाकी राहिले. गॅॅस वाहिनी तसेच तत्सम कामांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले. त्यामुळे नव्याने खड्डेमय रस्त्यांची भर पडली. १५ मे नंतर पावसाळापूर्व रस्ते आणि खड्डे दुरुस्तीची कामे करण्याची तयारी करण्यात आली. महापालिकेने याकरिता सुमारे ९० कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश दिल्याचे सांगितले जाते. परंतु, मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे डांबरीकरणातून कायमस्वरुपी रस्ता दुरुस्तीची कामे झाली नाहीत. या सर्वांचा परिणाम रस्त्यांच्या दुरावस्थेवर दिसत आहे.
लहान-मोठ्या रस्त्यांसह अंतर्गत प्रंमुख वळण रस्ते देखील खड्डेमुक्त राहिलेले नाहीत. प्रामुख्याने पंचवटीतील रस्त्यांची अधिक वाट लागली आहे. तपोवनकडून आडगाव नाक्याकडे, म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोड, तारवालानगरपासून अमृतधामकडे येणारा रस्ता, नाशिकरोड भागातील जयभवानी रस्ता, रासबिहारी शाळेकडून दिंडोरी रस्त्याकडे जाणारा मार्ग अशा अनेक भागात खड्डे दृष्टीपथास पडतात. तारवाला सिग्नलपासून काही अंतरावर रस्त्यावर मोठा खड्डा आहे. पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. अमृतधामला जोडणाऱ्या मार्गावर एका खड्ड्यात वाहने अडकून पडत होती. धोका टाळण्यासाठी स्थानिकांना त्यामध्ये झाडाची फांदी उभी करून सावधानतेचा इशारा देण्याची वेळ आली. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे. खड्ड्यांच्या प्रश्नावर दोन वर्षांपूर्वी माजी महापौर दशरथ पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. गामणे स्टेडियमलगतच्या रस्त्याची स्थिती मांडत त्यांनी बांधकाम विभाग व ठेकेदारांच्या संगनमताने शहरातील ८० टक्के खड्ड्यांची वाट लागली लागल्याचा आरोप केला.
मुख्यमंत्र्यांसाठी रस्ते दुरुस्ती
मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते. तेव्हा ते शहरातील ज्या, ज्या भागात कार्यक्रमांनिमित्त जाणार होते, त्या मार्गावर डांबरीकरणातून दुरुस्तीची दक्षता मनपा प्रशासनाने घेतली. तशीच रस्त्यांची दुरुस्ती कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दौऱ्यावेळी घेतली गेल्याचे काही उद्योजक सांगतात. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतून अवजड वाहने मोठ्या प्रमाणात मार्गक्रमण करतात. या भागासह शहरातील अनेक रस्त्यांत खड्डे असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
तात्पुरती मलमपट्टी पाण्यात ?
पावसामुळे डांबराने खड्डे बुजविता येत नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात ते बुजविण्याचे काम हाती घेतले गेले होते. या माध्यमातून सहा हजारच्या आसपास खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी केली गेली. मात्र, अलीकडेच अल्पावधीत मुसळधार पाऊस कोसळल्याने त्यावर केलेला खर्चही पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे.