नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ यात्रेत वैदु समाजाची जातपंचायत बसण्यापासून रोखली. एकट्या महिलेने केलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र शासनाने जातपंचायत विरोधी कायदा संमत केला आहे. त्यामुळे जातपंचायतीचे आयोजन कायद्याने गुन्हा आहे. पूर्वी मढी येथे भटके विमुक्त समाजाच्या अनेक जातपंचायत होत. परंतु, कायदा झाल्यानंतर आठ वर्षापासून जातपंचायतीचे आयोजन बंद झाले आहे.

या वर्षी भटके विमुक्त समाजातील वैदु समाजाच्या जातपंचायत आयोजनासाठी शनिवारी नारळ फुटले. रविवारी सकाळी ११ वाजता जातपंचायतीत न्यायदान करण्याचे ठरले. ही माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना कळली. त्यानंतर डाॅ. टी. आर. गोराणे, ॲड. रंजना गवांदे, कोमल वर्दे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तक्रार अर्ज दिला. त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करत मढी यात्रेत जातपंचायतची पहाणी करण्यासाठी पथक पाठविले. पोलीस पथकाने जातपंचायत घेणे बेकायदेशीर असल्याची जाणीव संबंधितांना करून दिली.

पोलिसी खाक्यामुळे जातपंचांनी नमते घेतले. परंतु, मेळाव्याच्या नावाखाली वैदु भाषेत त्यांनी जातपंचायत सुरु केली. ही माहिती मिळाल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे या नाशिकहून मढी येथे गेल्या. त्यांना वैदु भाषा समजत असल्याने जातपंचायत होत असल्याचे त्यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिले. पोलीस आल्याने जातपंचायतीचे लोक पळून गेले. पीडित व्यक्तींनी पंचांच्या कचाट्यातून सुटल्याने आनंद व्यक्त केला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर, हवालदार अदिनाथ बढे, पोलीस नायक सुकदेव धोत्रे, हवालदार ज्ञानेश्वर सानप, वाघ आदींनी सहभाग घेतला.

कुणावर जातपंचायतीकडून अन्याय होत असल्यास कृष्णा चांदगुडे (९८२२६३०३७८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैदु समाजाची जातपंचायत ही राज्यातील सर्वोच्च आहे. ती मागे कायमची बरखास्त करण्यात आली होती. तरीही इतके दिवस छुप्या पद्धतीने चालणारी जातपंचायत उघडपणे आयोजित करण्याची हिंमत पंच करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. – कृष्णा चांदगुडे (राज्य कार्यवाह, जातपंचायत मूठमाती अभियान, अंनिस)