सततच्या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत असून त्याचा परिणाम नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन आवक ३५ टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत. मंगळवारी कोथिंबिरच्या एका जुडीला १४० रुपये तर मेथी व कांदा पात प्रत्येकी ४०, पालकच्या जुडीला ३० रुपये दर मिळाले. आवक कमी असल्याचा परिणाम मुंबईला दैनंदिन पुरवठ्यावरही होत आहे.
हेही वाचा- जळगाव : पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मक्याचे नुकसान; जळगाव जिल्ह्यात बळीराजा संकटात
घाऊक बाजारात भाजीपाल्यांचे दर उंचावले
मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख आहे. भाजीपाल्याचे लिलाव होणारी नाशिक ही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथून दररोज १५० ते २०० टेम्पो भाजीपाला घेऊन मुंबईसह उपनगरांमध्ये जातात. मुसळधार पावसाने बाजार समितीत नियमित आवक ३० ते ३५ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या पुरवठ्यावर होणार असल्याचे सचिव अरूण काळे यांनी सांगितले. आवक कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर ५० टक्क्यांनी उंचावले आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका पालेभाज्यांना बसला. बाजारात दोन ते सव्वा दोन लाख कोथिंबिरच्या जुड्यांची आवक असते. सध्या ती अवघ्या १४ हजार ३०० जुड्यांवर आली आहे. मंगळवारी १०० जुड्यांना १४ हजार रुपये म्हणजे प्रति जुडी १४० रुपये दर मिळाले. तशीच स्थिती पालेभाज्यांची आहे. मेथी व कांदा पात प्रत्येकी ४० रुपये आणि पालकला ३० रुपये असे घाऊक बाजारात दर मिळाल्याचे काळे यांनी सांगितले. शेतात पालेभाज्या सतत ओलसर राहून खराब होत आहे. कोथिंबिर पिवळी पडते. त्यामुळे ओलसर पालेभाज्या खरेदी करणे व्यापारी टाळतात. घाऊक बाजारात दर कमालीचे उंचावल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे.
हेही वाचा- नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत ; हंगामात १०४ टीएमसीचा विक्रमी विसर्ग
घाऊक बाजारातील प्रति किलोचे दर
वांगी, भेंडी, गवार, वालपापडी, घेवडा, कारले, दोडके, गिलके आदींची आवक अतिशय कमी झाली आहे. बाजार समितीत वांगी (आवक १५४ क्विंटल) – प्रति किलो ६० रुपये, फ्लॉवर (३५८) १२ रुपये, कोबी (४८०) १५ रुपये, ढोबळी मिरची (३४५) ६९ रुपये, भोपळा (७१३) २७ रुपये, कारले (२६५) २५ रुपये, दोडगा (४२) ५५ रुपये, गिलके (४८) ३२ रुपये, भेंडी (५४), ३४ रुपये, गवार (१९) २० रुपये, काकडी (८२४) १९ रुपये, गाजर (४५) २० रुपये, वालपापडी (१३२) ५१ रुपये, घेवडा (३१७) ७० रुपये, आले (४५) ६० रुपये असे दर मिळाल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
