नाशिक : मागील काही वर्षात नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येत नसल्याची स्थानिक उद्योजक वर्तुळातील भावना दूर होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकमध्ये लिथियम आयन बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स सामग्री या दोन प्रकल्पांसाठी ५५६१ कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. या शिवाय, नंदुरबार जिल्ह्यात विशेष फिल्म्स निर्मितीसाठी ११०० कोटींची गुंतवणूक होणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात एकूण सहा हजार ६६१ कोटींच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यातून सुमारे दोन हजार रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विविध क्षेत्रात, वेगवेगळ्या भागात ३४ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे १७ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये नाशिकमधील दोन तर, नंदुरबार जिल्ह्यातील एक अशा तीन प्रकल्पांचा समावेश आहे. प्रगत बॅटरी सोल्यूशन्सद्वारे भविष्य उज्वल करण्याच्या दृष्टीकोनातून लिथियम आयन बॅटरीचा प्रकल्प सिंथेटीक ग्राफाईट अनोड मटेरियल (एसजीएएम) उभारणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकार आणि ग्राफाईट इंडिया यांच्यात करारावर स्वाक्षरी करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील गोंदे किंवा मुंढेगाव येथे हा प्रकल्प उभारला जाईल. त्यासाठी कंपनी ४७६१ कोटींची गुंतवणूक करणार आहे. या माध्यमातून ११६६ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.
राज्यातील इलेक्ट्रॉनिक उत्पादनास चालना देण्यासाठी व्हिर्च्यसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी करार करण्यात आला. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात कंपनी ८०० कोटींची गुंतवणूक करेल. या प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोलर्स, काँम्प्रेसर वातानुकूलीत यंत्र आणि धुलाई यंत्रासाठी मोटर्स आदींचे उत्पादन होईल. या प्रकल्पातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ५०० रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारावर न थांबता गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अलीकडेच महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या नव्या प्रकल्पासाठी इगतपुरीतील ३५० एकर जागेला संमती दर्शविली आहे. महिंद्रा पाठोपाठ दोन कंपन्यांनी नाशिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शविली आहे. गेल्या आठवड्यात आयमा इंडेक्स २०२५ गुंतवणूक महाकुंभ कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आगामी काळात नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक वाहन, विशेष धातू, जीवन विज्ञान, शीतगृह आदींशी संबंधित उद्योगात गुंतवणूक होणार असल्याचे म्हटले आहे. काही उद्योगांशी वाटाघाटी सुरू आहे. लवकर मोठी गुंतवणूक झाल्याचे लक्षात येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दोन कंपन्यांशी सामंजस्य करार झाल्यामुळे त्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याची भावना उद्योजक संघटनांमधून उमटत आहे.
नंदुरबारमध्ये विशेष फिल्म्सची निर्मिती
जनरल पॉलीमर प्रायव्हेट लिमिटेडकडून नंदुरबारमध्ये ११०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. बीओपीईटी फिल्म्स आणि मेटलाइज्ड फिल्मचे उत्पादन या प्रकल्पात होईल. या प्रकल्पातून २०० जणांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
