दुष्काळात आरक्षित शिल्लक पाणी कसे मिळावे यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागामध्ये आरोप-प्रत्यारोप

नाशिक : गंगापूर धरणातील पाण्यावरून सध्या महापालिका आणि पाटबंधारे विभागात शीतयुद्ध सुरू झाले आहे. न्यूनतम पातळीवरून पाणी उचलण्याची व्यवस्था करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. काटकसर न केल्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे संकट आहे, असा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे. तर पालिकेने याच धरणातून पाटबंधारे विभागाने गोदावरी नदी, कालव्यातून आवर्तन सोडल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे, याकडे लक्ष वेधल्याने या दोघांच्या शीतयुद्धात जनक्षोभ उसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापूरप्रसंगी धरणातील विसर्ग, पूररेषा आखणी, गोदाकाठावरील अतिक्रमणे, गोदापात्रातील पालिकेची बांधकामे या मुद्दय़ांवरून पूर्वी उभयतांमध्ये असेच वाद रंगले आहेत. दुष्काळात आरक्षित शिल्लक पाणी कसे मिळावे, यावरून आता उभयतांमध्ये मतभेदांना तोंड फुटले आहे.

महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यासाठी गंगापूर धरणातून ४२००, दारणा ४०० आणि मुकणे धरणामध्ये ३०० याप्रमाणे एकूण ४९०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. शहरास गंगापूर धरणातून ९० टक्के पाणीपुरवठा होतो, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

मात्र, पाटबंधारे विभागाने याच धरणातून गोदावरी नदी, कालव्यातून आवर्तन सोडल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली, असे महापालिकेचे म्हणणे आहे. धरणातील न्यूनतम पातळीच्या वर आरक्षित जलसाठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास शहरास पाणीपुरवठा करता येणार नाही याकडे लक्ष वेधणारे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला पाठविले आहे. परंतु हे पत्र मंगळवारी दुपापर्यंत पाटबंधारे विभागाला मिळालेले नव्हते.

सध्या ९५० दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. त्यात आरक्षणानुसार पालिकेचे ६२५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. ज्या आवर्तनाने पाणी पातळी कमी झाल्याचा आक्षेप घेतला जातो, ते पाणी बिगरसिंचनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सोडले गेले, असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

१०० दशलक्ष घनफूटची परवानगी असताना ७८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. दुष्काळी स्थितीत शहरात पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पालिकेला सूचित करण्यात आले होते. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले, असा आरोप पाटबंधारे विभागाने केला आहे.

सध्या पालिका गंगापूरमधून दररोज १३ ते १४ दशलक्ष घनफूट पाणी उचलते. पुढील २० ते २२ दिवस पाणी उचलताना अडचण येणार नाही. पाऊस लांबल्यास नंतर शिल्लक पाणी उचलण्यात अडचणी येतील. हे लक्षात आल्यावर महापालिका पत्रप्रपंच करीत असून त्यांचे पत्र प्राप्त झाल्यावर चोख उत्तर पाटबंधारे विभाग देईल, असे अधिकारी सांगतात. न्यूनतम पातळीवरून पाणी उचलण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यांनी ती व्यवस्था करावी असे सांगून पाटबंधारे विभाग हात वर करण्याच्या तयारीत आहे.

पालिकेकडून दिशाभूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेहेडी बंधाऱ्यात यंदा पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. नदीपात्रातून दूषित पाणी येते हा महापालिकेचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. उलट दारणा धरणात आजही जलसाठा आहे. चेहेडी बंधाऱ्यासाठी आवर्तन सोडण्याची तयारी आहे. दारणा नदीवर सिन्नर नगरपालिकेसह सात ते आठ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यांच्यामार्फत पाणी उचलून पिण्यासाठी वापरले जाते. दूषित पाण्याविषयी कोणतीही तक्रार नसताना महापालिका दिशाभूल करून गंगापूर धरणातून अधिकचे पाणी उचलत आहे. पाटबंधारे विभागाने यापूर्वी पत्राद्वारे गंगापूरऐवजी चेहेडी बंधाऱ्यातून पाणी उचलावे, असे सूचित केल्याकडे लक्ष वेधले जात आहे.