लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव : मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार आहे. अशा स्थितीत अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे स्वतः उपमुख्यमंत्री पद न स्वीकारता अन्य विश्वासू शिलेदाराची त्या पदी वर्णी लावण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने शिंदे यांचे निकटवर्तीय आणि मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघात सलग पाच वेळा विजय मिळविणारे दादा भुसे हेही उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले आहेत.

महायुतीतर्फे नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर सुखावलेल्या भाजपने मुख्यमंत्री पदावर स्वपक्षाचा दावा सांगणे सुरू केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे म्हणून भाजप आमदारांकडून सातत्याने दबाव सुरू आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, या अटीवर काही अपक्षांनीही भाजपला पाठिंबा देऊ केला. निवडणूक निकाल लागला न लागला तोच मुख्यमंत्रीपदासाठी भाजप व शिंदे गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. उभय गट आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत असतानाच भाजप जो निर्णय घेईल, त्यास पाठिंबा असल्याचे शिंदे यांनी जाहीर केल्याने मुख्यमंत्री पदावरील दावा त्यांनी सोडला असल्याचा अर्थ काढला जात आहे. शिंदे यांच्या भूमिकेनंतर नव्या सरकारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे गट, पवार गटाचे उपमुख्यमंत्री हे सूत्र महायुतीने मान्य केल्याचेही आता अधोरेखित होत आहे.

आणखी वाचा- मागणी मतदान यंत्र-व्हीव्ही पॅट चिठ्ठ्या पडताळणीची, प्रशासकीय तयारी मतदान प्रात्यक्षिकांची

सध्याच्या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील उपमुख्यमंत्री पद ते पुन्हा स्वीकारतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता कमी आहे. शिंदे गटाच्या कोट्यातील हे पद स्वतः स्वीकारण्याऐवजी अन्य विश्वासू सहकाऱ्याकडे जबाबदारी ते सोपवू शकतील. दादा भुसे हे शिंदे यांचे जुने मित्र व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. भुसे यांच्याकडे ज्येष्ठतादेखील आहे. उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाची संधी आजवर मिळालेली नाही. भुसे यांच्या रूपाने ही संधी दिली गेल्यास उत्तर महाराष्ट्राला न्याय दिल्यासारखे होईल आणि पक्ष संघटना वाढीसाठीही ते फायद्याचे ठरेल.

आणखी वाचा-दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्यानंतर पत्नीवर हल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठी जबाबदारी कोणती ?

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे भुसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मालेगावात आले होते. त्यावेळी झालेल्या सभेत नव्या सरकारमध्ये भुसे यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सुतोवाच कदम यांनी केले होते. त्याचा संदर्भही आता उपमुख्यमंत्रीपदाशी जोडला जात आहे.