जळगाव : देशसेवेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जिल्ह्यात २८ ठिकाणी शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेऊन भव्य स्मारक उभारण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घोडगाव (ता.चोपडा) येथे भारत-तिबेट सीमा पोलीस दलातील शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी केली.
२०२१ पासून मणिपूरमधील मोइरंग येथे तैनात असलेले चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील जवान सुनील पाटील यांना पाच ऑगस्ट २०२४ रोजी कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार चंद्रकांत सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुनील पाटील फक्त शेतकऱ्याचा मुलगा नव्हता, तर तो मातृभूमीचा सच्चा शूरवीर होता. त्याच्या शौर्याचे हे स्मारक पुढच्या पिढ्यांना देशसेवेचा प्रेरणादायी संदेश देत राहील, असे पालकमंत्री पाटील म्हणाले. याप्रसंगी, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या बेळगाव (कर्नाटक) येथून आलेल्या पथकाने गौरव सलामी दिली.
दरम्यान, पालकमंत्री पाटील व आमदार सोनवणे यांच्या वतीने शहीद जवान सुनील पाटील यांच्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत माजी आमदार लता सोनवणे यांच्या हस्ते पाटील कुटुंबाला सुपूर्द करण्यात आली. यावेळी शहीद जवान सुनील पाटील यांची आई मल्लिकाबाई पाटील, पत्नी पुनम पाटील, मुलगी समृद्धी, आजोबा प्रभाकर पाटील, चुलत भाऊ कैलास पाटील, जवान निरीक्षक संजय कुमार, सत्यम मलिक, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उद्योजक प्रकाश बाविस्कर, बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक रावसाहेब पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हरीश पाटील, चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर आदी उपस्थित होते.