जळगाव – शहरातील अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर बाह्यवळण महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षीत असा हा मार्ग नुकताच वाहतुकीस खुला झाला असून, अवजड वाहने त्यावरून धावताना दिसत आहेत. सध्या एका बाजुने प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू असताना बुधवारी सायंकाळी दोन मालमोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

एकेरी वाहतूक सुरू असताना अवजड व हलक्या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने वेगाची मर्यादा घालून दिली आहे. त्या संदर्भात सूचना देणारे फलक देखील बाह्यवळण महामार्गावर लावण्यात आले आहेत. प्रत्यक्षात त्यानंतरही मालमोटारी सुसाट धावत असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी सायंकाळी त्यामुळेच दोन मालमोटारींची समोरासमोर धडक झाली. दोन्ही मालमोटारींची धडक एवढी जोरात होती, की कोळशाने भरलेली मालमोटार आणि दुसऱ्या बाजुने आलेल्या टाईल्सने भरलेल्या मालमोटारीच्या कॅबिनचा पार चुराडा झाला. दोन्ही मालमोटारीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. पैकी एका चालकाचे नाव एस. के. मौलाली (४०, रा. एरूपालम, तेलंगणा) असे आहे. दुसऱ्या चालकाचे नाव समजू शकलेले नाही.

अपघातग्रस्त मालमोटारींपैकी एक मोटार गुजरात राजातील मोरबी येथून आंध्र प्रदेशातील खाकीनाडाकडे टाईल्स घेऊन जात होती. तर समोरून धडकलेल्या मोटारीत कोळसा भरलेला होता. अपघातानंतर दोन्ही मोटारींचे चालक आणि क्लिनर आतमध्ये अडकले होते. त्यांना चुराडा झालेल्या केबिनमधून मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. दरम्यान, दोन्ही अपघातग्रस्त वाहनांमधील कोळसा तसेच टाईल्स खाली करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर कुठे बाह्यवळण महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही चालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात रवाना केले. तसेच जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे बाह्यवळण महामार्गावर जवळपास पाऊणतास वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, पोलिसांच्या मदतीने नंतर दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजुला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. जळगाव तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. बाह्यवळण महामार्गाचे बरेच काम अद्याप शिल्लक आहे. त्यामुळे सध्या एकाच बाजुने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जो पर्यंत दोन्ही बाजुने वाहतूक सुरू होत नाही, तोपर्यंत अवजड वाहनांनी वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने केले आहे.