जळगाव – शहरातील अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर बाह्यवळण महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. बहुप्रतीक्षीत असा हा मार्ग वाहतुकीस खुला झाला असून, अवजड वाहने त्यावरून धावताना दिसत आहेत. दरम्यान, काही कामे शिल्लक असल्याने या महामार्गावरून सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.

पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्णत्वास येण्यास बरीच वर्षे लागली. बाह्यवळण महामार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी वाहनधारकांना पाळधीहून तरसोद जाण्यासाठी जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरून किमान पाऊण तासाचा वेळ लागत असे. मात्र, बाह्यवळण महामार्गामुळे पाळधी ते तरसोद प्रवासाची वेळ आता २० मिनिटांवर आली आहे. वाहनांच्या इंधन खर्चाची मोठी बचत त्यामुळे होत आहे. विशेष म्हणजे जळगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या आणि अपघाताचा धोका बऱ्यापैकी कमी झाला आहे. नागरिकांनी त्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. उड्डाणपुलांलगत सेवा रस्ते कार्यान्वित झाल्यानंतर नव्याने विकसित होणाऱ्या जळगाव शहराची तसेच परिसरातील गावांची मोठी सोय होणार आहे.

मुख्य महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आव्हाणे, ममुराबाद, आसोदा, तरसोद येथील उड्डाणपुलांच्या खालून जाणारे ग्रामीण भागातील रस्ते आता बाह्यवळण महामार्गाशी जोडले जात आहेत. भुसावळ किंवा एरंडोल-धरणगावकडे जाण्यासाठी कमी अंतराची सोय त्यामुळे संबंधित सर्व गावातील नागरिकांची झाली आहे. दरम्यान, बरीच कामे शिल्लक असताना बाह्यवळण महामार्गावरून काही दिवस एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. संभाव्य अपघातांचा धोका टाळण्यासाठी अवजड वाहनांना वेग मर्यादा देखील घालून दिली होती. प्रत्यक्षात, दोन वेगवेगळ्या अपघातात मालमोटारींची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. मात्र, बाह्यवळण महामार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने अवजड वाहनांची वेग मर्यादा आता वाढली आहे. अपघाताचा धोकाही टळला आहे.

दुसरीकडे, जळगाव शहरातील जुन्या महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जवळपास ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाल्याने एरवी जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. महामार्गावरील अपघातांमुळे यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. बाह्यवळण महामार्ग सुरू झाल्यानंतर शहरातील जुन्या महामार्गावरील पाळधी ते खोटेनगर आणि कालिंकामाता मंदिर ते तरसोद फाट्यापर्यंतच्या अंतराचे रूंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच हाती घेण्यात आले.

पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्णत्वास आल्याने दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे तेवढी अपूर्ण आहेत, ती पुढील १५ दिवसात पूर्ण केली जातील. – दिग्विजय पाटील (अभियंता- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जळगाव)