जळगाव – बहुप्रतिक्षीत असा बाह्यवळण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर शहराचा उत्तरेकडे विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव त्या दिशेने विकसित होण्याची चिन्हे दिसत असताना, शहरालगतच्या गावांनाही आता भाव आला आहे. दरम्यान, बाह्यवळण महामार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर काही जुने रस्ते आता उजेडात आले आहेत. ज्यांच्या आजुबाजुला नवीन शहर विकसित होण्यास अनुकूल स्थिती आहे.
जळगावपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर वसलेली आव्हाणे, खेडी, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद ही काही गावे आता विकासाच्या उंबरठ्यावर उभी आहेत. शहर इतक्या जवळ असतानाही या गावांनी आतापर्यंत आपली ग्रामीण जीवनशैली जपली होती. आपली शेती भली आणि आपले गाव भले, या भावनेतून ग्रामीण जीवनाशी नाते दृढ ठेवत त्यांनी गावपणाची ओळख टिकवली होती. मात्र, बाह्यवळण महामार्गामुळे संबंधित सर्व गावांमध्ये आता प्रगतीची चाहूल लागल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. बाह्यवळण महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या गावांच्या चित्रात मोठा बदल घडू लागला आहे. कालपर्यंत विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या गावांमध्ये आता नव्या शक्यता डोकावू लागल्या आहेत. महामार्गाशी थेट जोडले गेल्याने गावांच्या प्रगतीचा वेग वाढेल, अशी आशा ग्रामस्थांच्या मनात उभी राहिली आहे.
उद्योग-व्यवसायांच्या नव्या वाटा खुल्या होतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गावांची आर्थिक घडण अधिक भक्कम होईल, असा विश्वास नागरिकांनी बाळगायला सुरुवात केली आहे. दरम्यान, बाह्यवळण महामार्गामुळे इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या ग्रामीण मार्गांनाही आता अचानक मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या रस्त्यांच्या आजुबाजुला असलेल्या शेती शिवाराकडे विकसकांसह गुंतवणूकदार हळूहळू आकर्षित होऊ लागले आहेत. पाळधी ते तरसोद दरम्यानचा बाह्यवळण महामार्ग अस्तित्वात नव्हता तोपर्यंत किंवा वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत साधी बैलगाडीची वाट असलेले रस्तेही आता उजेडात आले आहेत. त्यापैकीच एक असलेला पिंप्राळा ते ममुराबाद, हा ग्रामीण रस्ता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
एकेकाळी शेतांमध्ये जाण्यासाठी सोय म्हणून सदरचा रस्ता ओळखला जात असे. मात्र, गेल्या वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ग्रामीण मार्गात दर्जोन्नती झाल्यानंतर सदर रस्ता प्रकाश झोतात आला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पिंप्राळा ते ममुराबाद या चार किलोमीटर रस्त्याचे काम प्रस्तावित असून, पुढील वर्षी त्यास गती मिळण्याची शक्यता आहे. जळगाव-कानळदा रस्त्यावरील स्वामी समर्थ शाळेपासून सुरू होणारा हा रस्ता बाह्यवळण महामार्ग ओलांडून थेट ममुराबादकडे जातो. त्यासाठी महामार्गावर बोगद्याची व्यवस्थाही केली आहे. सद्यःस्थितीत कच्च्या स्वरूपात असलेल्या या रस्त्याचे स्वामी समर्थ शाळेपासून महामार्गापर्यंत काँक्रिटीकरण केले जाणार आहे, तर पुढे ममुराबादपर्यंत डांबरीकरण होणार आहे.
पिंप्राळा ते ममुराबाद हा रस्ता पूर्णत्वास आल्यास बाह्यवळण महामार्गावरून कमी वेळात ममुराबादकडे तसेच शिवाजीनगरकडे जाणे शक्य होईल. विशेष म्हणजे पक्का रस्ता तयार झाल्यामुळे लहान-मोठ्या उद्योगांसह फार्म हाऊस, गोदामे, नागरी वस्त्या यांच्यासाठी परिसरात मुबलक जागा उपलब्ध होईल. त्यादृष्टीने विकसकांसह गुंतवणुकदारांचे पिंप्राळा ते ममुराबाद रस्त्याकडे लक्ष वेधले गेले आहे. काही विकसकांनी या रस्त्यालगत बिनशेतीकरण केलेल्या शेतांमध्ये प्लॉट पाडून स्वखर्चाने काँक्रीट रस्ता तयार केल्याचे दिसून येत आहे.