जळगाव – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर्वांना सांभाळून घेत असल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे जाहीरपणे कौतूक केले. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्हाधिकारी राजकारणात येण्यास उत्सूक असल्याचा टोला हाणला. अशा माणसांची आपल्या पक्षाला गरज असल्याचे सांगून त्यांना भाजपमध्ये येण्याची थेट ऑफर त्यांनी देऊन टाकली. केंद्रात किती अधिकाऱ्यांना आम्ही मंत्री केले आहे. मागेपुढे त्यांचाही विचार होईल, असेही ते म्हणाले.

जळगावमध्ये शुक्रवारी महसूल सप्ताहानिमित्त उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याठिकाणी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी केली. प्रसंगी जिल्ह्यात महायुतीचे चार मंत्री असले, तरी अधिकारी पण तितकेच कलाकार आहेत. जसा माणूस येतो तसे ते बोलतात. जामनेर (गिरीश महाजन) आलं की जामनेरसारखं, भुसावळ जंक्शन (संजय सावकारे) आलं की भुसावळसारखं आणि मी मध्ये बसलो आहे एरंडोली करणारा, अशी टोलेबाजी त्यांनी केली. पालकमंत्री पाटील यांच्यानंतर बोलण्यासाठी उभे राहिलेले मंत्री महाजन यांनीही जोरदार फटकेबाजी केली.

गुलाबभाऊ आपण आपण शासनकर्ते आहोत आणि आपणच नियम बनवले आहेत. त्यामुळे आपण मंत्र्यांनी महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टीका करू नये. हा विषय विधानसभेत आणि कॅबिनेटमध्ये मांडायचा आहे, असे बोलून मंत्री महाजन यांनी पालकमंत्री पाटील यांनी महसूलच्या कारभारावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कोणत्याही प्रकरणात ज्यांनी निकाल दिला आहे, तेच तहसीलदार फेर तपासणीसाठी कसे येतात ? पहिला तहसीलदार खोटा होता का ? हे कधी कधी मला कळत नाही, अशी खंत पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, जळगावमधील जिल्हाधिकाऱ्यांचे काम चांगले आहे. आणि सर्वांना ते सांभाळून घेतात. सगळ्यांना ते आपलेच वाटतात. शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांना सुद्धा ते मामा म्हणतात. खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी सर्वांना मामा बनवतात. मी पुढे मागे नोकरीत राहणार नाही. मला राजकारणात यायचे आहे, असे ते एकदा म्हणाले होते. अशा माणसांची आम्हाला गरज आहेच. केंद्रात देखील किती अधिकाऱ्यांना आम्ही मंत्री केले आहे. ते तुम्ही बघितले आहे. मागेपुढे निश्चित त्यांचाही विचार होईल, अशी मिश्किल टिप्पणी मंत्री गिरीश महाजन यांनी केली.