जळगाव – जिल्ह्यात ऑगस्ट महिना सुरू झाला तरी अद्याप कुठेच शेतांमधून पाणी वाहून निघालेले नाही. त्यात आता पावसाने गेल्या १५ दिवसांपासून दडी मारली आहे. अशा स्थितीत, फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बहुतेक सर्व पिकांची खूपच नाजूक अवस्था झाली आहे. दुपारच्या वेळी पिके ऊन धरू लागल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाचे आगमन उशिरा झाल्याने जिल्ह्यात खरिपाची पेरणी मूळात उशिरा म्हणजे जूनच्या अखेरीस सुरू झाली होती. वेळ वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अल्प ओलाव्यावरच पेरण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने अल्प ओलाव्यावर उगवलेली पिके आता नाजूक स्थितीत पोहोचली आहेत. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी आंतरमशागतीसह किटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा डोस देण्यासारखी कामेही तात्पुरती थांबवली आहेत.

दमदार पावसाअभावी वाढीच्या तसेच फुलोरा व शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. दमदार पावसाअभावी नदी व नाले अजुनही वाहताना दिसलेले नाहीत. विहिरींसह कूपनलिकांच्या पाणी पातळीतही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. त्यासाठी बरेच शेतकरी ठिबक, तुषार सिंचनावर भर देत आहेत. पाण्याची कोणतीच सोय नसलेल्या शेतकऱ्यांवर मात्र आभाळाकडे पाहण्याची वेळ आली आहे.

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी ६३२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात, आठ ऑगस्टअखेर सरासरी २४६.८ मिलीमीटर (३९ टक्के) इतकाच पाऊस पडला आहे. त्यातही १५ पैकी पाच तालुक्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये रावेर, यावल, अमळनेर, चोपडा आणि धरणगाव या तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यांतही पावसाची फार समाधानकारक स्थिती नाही.

जुलैअखेरपर्यंत पावसाची थोडीफार रिमझिम सुरू राहिल्याने खरीप पिके तग धरून तरी उभी होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर तापमानाचा पारा वाढल्याने खरीप पिके आता ऊन धरू लागली आहेत. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास कपाशी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना मोठा फटका बसण्याची तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीवरील पिकांना पाण्याचा ताण पडला असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पीकस्थिती अधिक नाजूक झाल्याचे दिसून येत आहे. संरक्षित पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पिकांना तातडीने पाणी देण्याची व्यवस्था करावी. – कुर्बान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव)