जळगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून ३२३१ कंट्रोल आणि ३३३२ बॅलेट युनिट उपलब्ध झाले आहेत. या सर्व यंत्राची तपासणी संबंधित तहसील कार्यालयात २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे.
गट आणि गणांची प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांच्या निवडणूक तयारीला आता प्रशासनाने वेग दिला आहे. या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सुमारे २४ लाखांवर मतदार त्यांचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ६७ गट आणि १३४ गण होते. नवीन गट आणि गण रचनेनुसार आगामी काळात ६८ गट आणि १३६ गणांसाठी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून, त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदविता येतील. नागरिकांना जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसह पंचायत समितीच्या १३६ गणांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती व सूचना जिल्हाधिकारी कार्यालय अथवा संबंधित तहसील कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात सादर करता येतील.
एक जुलैअखेर जिल्ह्यात सुमारे ३७ लाख ७२ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. पैकी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सुमारे २४ लाख दोन हजार ४०२ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. याशिवाय, १६ नगरपालिकांसाठी आठ लाख ४६ हजार १५४ मतदार, नगरपंचायतींसाठी ४४ हजार ८५९ आणि नगरपरिषदांसाठी सहा लाख १५४ मतदार हक्क बजावतील.
यंदाच्या निवडणुकीत जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा आणि रावेर सात तालुक्यांत लोकसंख्या वाढीसह नगरपरिषद व नगरपंचायत अस्तित्वात आल्यामुळे तसेच पालिका हद्दीत काही गावे समाविष्ट झाल्याने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या रचनेत बदला झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून ३२३१ कंट्रोल आणि ३३३२ बॅलेट युनिट उपलब्ध झाले आहेत. या सर्व यंत्राची तपासणी संबंधित तहसील कार्यालयात २२ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची पाचवी बैठक आयोजित करण्यात आली. त्यात प्रामुख्याने बी.एल.ए.नियुक्ती आणि मतदार जागरूकता उपक्रमावर चर्चा झाली. तसेच मतदार यादीच्या सातत्यपूर्ण अद्ययावतीकरणासाठी सूचना देण्यात आल्या. नवीन मतदार नोंदणी व सुधारणा प्रक्रियेवरही मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने पारदर्शक व विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून सहकार्याचे आवाहन सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केले.