जळगाव – राज्यातून फळांसह भाजीपाला तसेच इतर उत्पादनांच्या निर्यातीला अलिकडच्या काळात चांगली चालना मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या चार वर्षांच्या कालखंडात विविध उत्पादनांची निर्यात सुमारे १२ हजार ४०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. ज्यामध्ये कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे.
खुल्या जागतिक व्यापार करारामुळे निर्यातीच्या मोठ्या संधी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, निर्यात होणाऱ्या कृषी व अन्न प्रक्रिया उत्पादनांच्या गुणवत्तेचे निकषही तितकेच कठोर झाले आहेत. निर्यातीसाठीचा शेतीमाल हा पूर्णतः कीड व रोगमुक्त असणे आवश्यक असते. तसेच त्यामध्ये रासायनिक उर्वरक किंवा कीटकनाशकांचे अंश जागतिक मान्यतेच्या मर्यादेत असणेही तितकेच महत्वाचे मानले जाते. याशिवाय उत्पादनांची साखळी ओळख म्हणजेच शेतकऱ्यांपासून अंतिम ग्राहकापर्यंतच्या प्रवासाची नोंद तसेच वेष्ठण आणि वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असावी लागते. या सर्व आव्हानांना तोंड देत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह अन्न प्रक्रिया उद्योजकांनी गेल्या काही वर्षात निर्यातीत बऱ्यापैकी सातत्य राखले आहे. त्यात उत्तरोत्तर वाढच होताना दिसत आहे.
जिल्ह्यातून २०२१-२२ ते २०२४-२५ या चार वर्षांच्या कालखंडात फलोत्पादनासह अन्न प्रक्रिया, प्लास्टिक, औषधी, रबर, ग्लास, पेट्रोलियम, कापड, इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक, लोखंड-स्टील, पादत्राणे उत्पादने आणि रसायनांची सुमारे १२ हजार ४०० कोटी रूपयांची निर्यात विविध देशांमध्ये झाली. त्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांचाच वाटा पाच हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्येही सर्व क्षेत्रातून तीन हजार कोटी रूपयांची निर्यात झाली असताना, त्यात कृषी व अन्न प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीचा वाटा सुमारे १३०२.७५ कोटी रूपये इतका आहे.
जळगाव जिल्ह्याची निर्यात (२०२४-२५)
■ केळी- १०९.९९ कोटी रूपये
देश- इराण इराक, नेपाळ, ओमान, सौदी अरब, युएई, उझबेकिस्तान, रशिया, स्पेन.
■ मका (स्टार्च, पीठ, फ्लेक्स, पेंड इ.)- २६८.६२ कोटी रूपये
देश- अंगोला, बांगलादेश, कंबोडिया, बहरीन, इराक, जॉर्डन, कतार, मलेशिया, स्वीडन, हाँगकाँग, इस्राएल, जर्मनी, कुवेत, सिंगापूर, यूके, अमेरिका, युएई.
■ डाळी- ४१७.९० कोटी रूपये
देश- ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, फ्रान्स, अफगाणिस्तान, बेल्जियम, अमेरिका, ग्रीस.
जिल्ह्यातील कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रातील उद्योगांना निर्यातीत मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. संबंधित सर्व घटकांना प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसह निर्यातीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि प्रोत्साहन जिल्हा उद्योग केंद्राकडून केले जाते. – चेतन पाटील (महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव)