जळगाव – जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळविण्यासाठी विशेषतः भाजपने दुसऱ्या पक्षाचे जास्तीत जास्त लोक आपल्या पक्षात घेण्याची रणनिती आखली आहे. त्यासाठी भाजप नेते जीवाचे रानही करताना दिसत आहेत. मात्र, अचानक अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने काही जुन्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांनीच आता महायुतीतीलच शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकजुटीच्या बळावर महायुतीच्या भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तिन्ही पक्षांनी मोठे यश मिळविले होते. सत्ता स्थापनेवेळीही महायुतीच्या कोणत्याच घटक पक्षाने फार आदळआपट न करता जे पदरात पडेल त्यावर समाधान मानले होते. परंतु, इतके दिवस सुखाचा संसार सुरू असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागताच महायुतीचे तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करू लागले आहेत. महापालिकेसह नगरपालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही इतक्याच जागा लढवू, असाही दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. अर्थात, जास्त संख्येने जागा निवडून आणायच्या असतील तर जिंकण्याची क्षमता असणारे तितके सक्षम उमेदवारही आपल्याकडे असायला हवेत, यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला आहे. त्याबाबतीत भाजप विशेष आघाडीवर असताना, मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटासह शरद पवार गट आणि काँग्रेसचे अनेक मोहरे आपल्या पक्षात घेण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे.

असे असताना, भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील मंत्री गिरीश महाजन यांनाच त्यांच्या पक्षातून आता अंतर्गत विरोध होऊ लागल्याचे बोलले जात आहे. जो कोणी पक्षातील पदाधिकारी महाजन यांच्या त्या प्रयत्नांना हातभार लावत असेल त्यालाही खाली काम करणारे पदाधिकारी आता पाण्यात पाहु लागल्याचे सांगितले जाते. अंतर्गत गटबाजीला कंटाळलेल्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देत महायुतीतीलच शिंदे गटात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. भाजप सोशल मीडिया आघाडीचे जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक पाटील त्यापैकीच एक. त्यांच्यासह जळगाव तालुक्यातील वसंतवाडीचे सरपंच विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठोसरे आणि सोपान सूर्यवंशी यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपमध्ये इतकी वर्षे इमानेइतबारे निष्ठेने काम केले. मात्र, अलिकडे पक्षात निष्ठावानांना डावलण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नेत्यांचे काही एक म्हणणे नसताना खाली काम करणारे पदाधिकारीच आपली मनमानी करू लागले आहेत. – दीपक पाटील (जिल्हाध्यक्ष- भाजप सोशल मिडिया आघाडी, जळगाव)