जळगाव – जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाची फक्त रिपरिप सुरू आहे. दमदार पाऊस पडत नसल्याने नद्या व नाले अद्याप खळाळताना दिसून आलेले नाहीत. विदर्भासह मध्य प्रदेशातील पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूरचे २२ दरवाजे उघडावे लागले होते. मात्र, आवक घटल्याने १० दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत. १२ दरवाजांमधून १९ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तापी नदीवरील हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे पाटबंधारे विभागाने गेल्या रविवारी ४६ पैकी २२ दरवाजे एक मीटरने उघडले होते. परिणामी, तापी नदीला मोठा पूर आल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला होता.

नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, दोन दिवसानंतर पुन्हा पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी होऊन पाण्याची आवक कमी झाली. आता हतनूरचे फक्त १२ दरवाजे एक मीटरने मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून मंगळवारी सकाळी आठ वाजता १९ हजार ५२९ क्यूसेकने सांडव्यातून विसर्ग सुरू होता. याशिवाय कालव्यातून २०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

दरम्यान, हतनूरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असताना तापीवरील शेळगाव बॅरेजच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. त्यामुळे पाटबंधारे विभागाने बॅरेजचे पाच दरवाजे दोन मीटरने आणि पाच दरवाजे एक मीटरने उघडले होते. ज्या माध्यमातून ४२ हजार ८२३ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. हतनूरचा विसर्ग घटल्यानंतर आता शेळगाव बॅरेजमधून होत असलेला विसर्गही कमी करण्यात आला आहे. पाण्याची आवक कमी झाल्यास हतनूरसह शेळगाव बॅरेजचा विसर्ग आणखी कमी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

मध्यम प्रकल्पांत २८ टक्के साठा

दरम्यान, जिल्ह्यात पावसाला पाहिजे तसा जोर नसल्याने बऱ्याच मध्यम प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणी साठा दिसून आलेला नाही. गेल्या वर्षी २८ जुलैअखेर मध्यम प्रकल्पांमध्ये २५ टक्के उपयुक्त पाणी साठा होता. यंदाही वेगळी परिस्थिती नसून आजतागायत जेमतेम २८ टक्के उपयुक्त साठा झाला आहे. एकमेव सातपुड्यातून उगम पावणाऱ्या सुकी नदीवरचे धरण १०० टक्के भरले आहे. बोरी, भोकरबारी आणि अग्नावतीमध्ये थेंबभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही. गूळ, तोंडापूर, हिवरा, मन्याड आणि बहुळा या प्रकल्पांची स्थितीही चिंताजनकच आहे.