जळगाव – जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरी जमिनीची वाफसा स्थिती आता संपली आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले आहे. बहुतांश ठिकाणी कपाशीत आकस्मिक मरचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. ज्यामुळे मोठ्या कष्टाने जगवलेले पीक अचानक कोमेजू लागल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
विविध कारणांनी कापसाची शेती सातत्याने तोट्याची ठरल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात जवळपास २० टक्क्यांनी कपाशीची लागवड कमी केली आहे. त्या ऐवजी मका, सोयाबीन पिकांवर भर दिल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात, त्यानंतरही जिल्हाभरात यंदा सुमारे चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. त्यातील सुमारे ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू तर २० टक्के क्षेत्र बागायती आहे. पैकी पूर्व हंगामी कपाशीचे पीक सध्या फुल पात्या लागण्याच्या अवस्थेत तर कोरडवाहू कपाशीचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे.
दरम्यान, कमी-अधिक प्रमाणात सर्वदूर पावसाची अधुनमधून हजेरी लागत असल्याने कोरडवाहू आणि पूर्व हंगामी कपाशीच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. मात्र, सततच्या पावसामुळे पुरेशा वाफसा स्थितीअभावी आंतरमशागतीच्या कामांना पाहिजे तेवढा वेळ देता न आल्याने कपाशीमध्ये तणांचे साम्राज्य आता तितकेच वाढले आहे.
रस शोषणाऱ्या कीडींना तणांमुळे मोकळे रान मिळाले आहे. तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने कपाशीचे पीक पिवळे पडून पाने लाल पडत असल्याची लक्षणे सुद्धा दिसून आली आहेत. आकस्मिक मरचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला असला तरी त्यावर नियंत्रण मिळविण्यात त्यांना अद्याप फारसे यश आलेले नाही.
अति पावसामुळे शेतात पाणी साचल्यास कपाशीच्या वाढीवर आणि उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. झाडे दीर्घकाळ पाण्यात बुडून राहिल्यास त्यांच्या मुळांमध्ये कुज येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन मुळे पूर्णपणे निकामी होऊ शकतात. काळ्या भारी जमिनीत पाण्याचा निचरा मंद गतीने होतो, त्यामुळे मुळांच्या आजूबाजूचा वाफसा कमी पडतो. अशा परिस्थितीत मुळे अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकत नाहीत आणि झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे तातडीने पाण्याचा निचरा करणे व रोगप्रसार टाळण्यासाठी योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते.
रोगावर उपाययोजना काय ?
कपाशीचे पीक पिवळे पडणे, मलूल होऊन वाळणे किंवा संपूर्ण पाने आणि खोडे लाल पडून पिकाची वाढ थांबल्याची लक्षणे सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानंतर दिसून येतात. तेव्हा दीड टक्का युरिया (१०० लिटर पाण्यात दीड किलो युरिया) किंवा दीड टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची कपाशीवर फवारणी करावी. याशिवाय रोगग्रस्त झाडांच्या खोडाभोवती त्या द्रावणाची आळवणी (ड्रेचिंग) करावी. १५ दिवसांनंतर दोन टक्के डाय-अमोनिअम फॉस्फेटच्या द्रावणाची (प्रति १०० लिटर पाण्यात दोन किलो) आळवणी करावी व पाणी द्यावे. ओलावा नसताना रासायनिक खतांची मात्रा जमिनीतून देण्याऐवजी फवारणीच्या माध्यमातून द्यावी. शेतात पाणी साचलेले असल्यास चारी तयार करून अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. शेत तणविरहित ठेवावे, असा सल्ला कापूस संशोधन केंद्राने दिला आहे.