जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत रक्षाबंधनाच्या सणापूर्वी २४ कॅरेट सोन्याचे दर उच्चांकी प्रति १० ग्रॅम एक लाख चार हजार ५४५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यांनतर गुरूवारी आणि शुक्रवारी सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक गाठला. अमेरिकेचे ५० टक्के आयात शूल्क लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसात सोन्याचे दर वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे.

सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना केवळ अलंकारिक महत्व नसून, आर्थिक आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही मोठे स्थान आहे. विशेषतः भारतासारख्या देशात सोने ही परंपरेशी, संस्कृतीशी आणि सुरक्षित गुंतवणुकीशी जोडलेली गोष्ट मानली जाते. सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक प्रकारची अनिश्चितता जाणवत आहे. अमेरिका, युरोपसारख्या देशांमधील व्याज दरातील बदल, महागाई दर, युद्धजन्य परिस्थिती, जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे गुंतवणूकदारांना स्थिर आणि सुरक्षित पर्याय हवा असतो. अशा वेळी सोने आणि चांदीसारखे मौल्यवान धातू सुरक्षित गुंतवणूक म्हणून निवडले जातात. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. कधी थोडी घसरण झाली तरी लगेचच पुन्हा दर उंचावतात. काल सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे सोने उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमतीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सोने आणि चांदी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. या गुंतवणूकीसाठी मागणीचे नवीन मार्गही उघडत आहेत. त्यांनी चांदी व्यतिरिक्त सोन्याच्या किमती आता एकत्रीकरणाच्या टप्प्यात म्हणजेच स्थिरतेच्या काळात जाऊ शकतात. दरम्यान, सोने-चांदीचा बाजार सध्या आर्थिक मंदीतून जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये झालेल्या प्रचंड वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर झाला आहे. दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ ६० ते ७० टक्क्यांनी घटली आहे. महागाई आणि वाढत्या किंमतीमुळे ग्राहक महागडे दागिने खरेदी करण्यास मागे पुढे पाहत आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांच्या बजेटवर याचा मोठा ताण आला आहे. परिणामी, बाजारातील व्यवहार मंदावले असून आधीची गर्दी आणि उत्साह आता दिसत नाही.

पूर्वी लग्नसराईत ज्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी व्हायची, ती आता जवळजवळ गायब झाली आहे. लग्न हा भारतीय संस्कृतीतील मोठा खर्चाचा भाग असून, त्यात सोने-चांदी खरेदी परंपरेचा भाग असतो. परंतु किंमतीतील वाढ आणि आर्थिक ओढाताण यामुळे ग्राहक केवळ आवश्यक खरेदीवरच भर देत आहेत. बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. किंमती वाढल्यामुळे ग्राहक दागिने खरेदीपासून दूर जात आहेत. जळगावमध्येही रक्षाबंधन सणानंतर सोने दरात बरेच चढ-उतार पाहण्यास मिळाले. मात्र, गुरूवारी सोन्याचे दर उच्चांकी एक लाख चार हजार ९५७ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम ५१५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने २४ कॅरेट सोने दराने प्रति १० ग्रॅम जीएसटीसह एक लाख पाच हजार ४७२ रूपयांपर्यंत मजल मारून पुन्हा नवा उच्चांक केला.

चांदीचे दर स्थिरच

जळगावमध्ये चांदीचे दर चार दिवसांपूर्वी अचानक तीन हजार रूपयांनी वधारून एक लाख २१ हजार ५४० रूपयांपर्यंत पोहोचले होते. तेव्हापासून चांदीच्या दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आलेली नाही. हरितालिकेच्या दिवशीही चांदीचे दर स्थिर राहिले होते. शुक्रवारी देखील कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख २१ हजार ५४० रूपयांवर स्थिर राहिले. ग्राहकांना त्यामुळे दिलासा मिळाला.