जळगाव – जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात बोरी नदीच्या काठावरील एका गावात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४० लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, ग्रामीण भागातील या मोठ्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना बहादरपूर गावाजवळील बोरी नदीच्या काठावर एका पत्र्याच्या शेडमध्ये टँगो पंच नावाचा बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पारोळा पोलिसांनी तिथे छापा टाकला. निर्जनस्थळी गेल्या महिनाभरापासून बिनबोभाटपणे सदरचा बनावट देशी दारूचा कारखाना सुरू होता. ज्याची कोणालाच माहिती नव्हती.
पोलीस पथकाने दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत बहादरपूर येथील बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तयार असलेली आणि विक्रीसाठी पाठवण्यात येणारी देशी दारू, त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, यंत्र सामग्री, वाहने आणि इतर साहित्य जप्त केले. या वेळी घटनास्थळावरून सुमारे एक लाख २४ हजार रूपये किमतीच्या ३१०० सीलबंद दारूच्या बाटल्या, २८०० रूपये किमतीच्या ७०० विक्री पूर्व अवस्थेतील बाटल्या, तीन लाख ५५ हजार रूपयांचे ८०० लिटर स्पिरीट, तीन लाख रूपयांची १,५०० लीटर तयार दारू, १० लाखांचे आर.ओ., सी.एन.सी. आणि इतर यंत्रे, सहा लाख १२ हजाराची ३० हजार टँगो पंचची झाकणे, ६१ हजार २०० रिकाम्या बाटल्या, १० लाखांचे मालवाहू वाहन आणि मोटार, पाच लाखांचे पत्र्याचे शेड, असा एकूण ४० लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे यांच्यासह हवालदार महेश पाटील, शरद पाटील, प्रवीण पाटील, अनिल राठोड, अजय बाविस्कर, आकाश माळी, विजय पाटील, शेखर साळुंखे, चालक संजय पाटील आणि वेलचंद पवार यांच्या संयुक्त पथकाने सदरची कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे ग्रामीण भागात पोलिसांची नजर चुकवून बनावट देशी दारूची निर्मिती करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशा प्रकारे इतर ठिकाणी देखील देशी दारू निर्मितीचे कारखाने सुरू आहेत का, त्याचा तपास पोलीस करत आहेत.