जळगाव : चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाची शिकार करून मांस व शिंगे विक्रीसाठी फिरणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन जणांना ग्रामीण पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून हरणाचे ताजे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वांगऱ्या बारेला (४८) आणि धुरसिंग बारेला (४५, दोन्ही रा. वरला, मध्य प्रदेश) हे चोपडा तालुक्यातील वैजापूर आणि परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी राकेश पाटील आणि गजानन पाटील यांना मिळाली होती. वन्य प्राण्यांच्या मांस तस्करी संदर्भात गुन्हा असल्याने त्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविण्यात आले. त्यानंतर बोरअजंटी ते वैजापूर या रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहायक फौजदार राजु महाजन, हवालदार राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनिल कोळी तसेच वन विभागाचे अधिकारी विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी.आर.बारेला, वनरक्षक बानू बारेला आणि वनरक्षक योगेश सोनवणे यांच्या पथकाने नाकाबंदी केली. त्याच वेळी दुचाकीने जात असलेल्या वांगऱ्या आणि धुरसिंग या दोघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याजवळ हरणाची दोन शिंगे आणि ताजे मांस आढळून आले.पोलिसांनी मांस आणि शिंगे जप्त करून दोन्ही संशयितांना चोपड्यात आणले.
मे महिन्यातही अवैधरित्या हरणांची शिकार करून त्यांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश चाळीसगाव भागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखाली उपवनसंरक्षक प्रवीण ए. आणि सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिरासदार यांच्या पथकाने केला होता. सातपुडा पर्वतातील जंगलात वावरणाऱ्या हरणांची शिकार करून त्यांचे मांस व कातडी यांची तस्करी एरवी सर्रास केली जाते. वन विभागाकडून मुख्य रहदारीच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली जात असली, तरी तस्करांना जंगलातून बाहेर पडणाऱ्या गुप्त पायवाटा माहिती असतात. त्याच मार्गाने ते वन विभागाची नजर चुकवून हरणांचे मांस, कातडी आणि शिंगांची तस्करी करण्यात यशस्वी होतात. वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे आढळून आल्यास दोषींना कायद्याने कठोर शिक्षा करण्याची तरतूद देखील आहे. मात्र, तस्कर कायद्यालाही जुमानत नसल्याचे दिसून येते. गावठी बंदुकांसह गांजानंतर वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान त्यामुळे आता वन विभागासह पोलीस प्रशासनासमोर आहे.