जळगाव – जिल्ह्यातील भुसावळ शहरात जामनेर रस्त्यावर असलेल्या एका गॅरेजमध्ये गॅस संचाची (गॅसकिट) दुरुस्ती सुरू असताना गुरुवारी रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीने अचानक पेट घेतला. त्यात मोटार पूर्णतः जळून खाक झाली. गॅरेजचे बरेच नुकसान झाले. या प्रकरणी पोलिसांनी आगीचे कारण जाणून घेण्यासाठी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

भुसावळात जामनेर रस्त्यावर असलेल्या न्यू महालक्ष्मी गॅरेजमध्ये गुरुवारी दुपारी प्रवासी वाहतूक करणारी मोटार गॅस संचाच्या नळीमधून सुरू असलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी दाखल झाली होती. गॅरेजमधील कारागिरांनी रात्री उशिरा दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर मोटारीचे इंजिन सुरू करताच आगीचा भडका उडाला. गॅरेजमधील कारागिरांसह परिसरातील नागरिकांची त्यामुळे एकच धावपळ उडाली. गॅरेजमध्ये अन्य वाहनांच्या बॅटरी चार्जिंग करण्यासाठी शेजारी लावलेल्या होत्या. मोटारीला लागलेल्या आगीच्या ज्वाळांमुळे चार्जिंगसाठी लावलेल्या बॅटरींचा स्फोट होऊन आणखी मोठा भडका उडाला. दरम्यान, प्रसंगावधान राखून गॅरेजच्या मागील बाजूला ठेवलेले दोन घरगुती गॅस सिलिंडर तातडीने दूर नेण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गॅरेजसमोरच पेट्रोल पंप देखील आहे. तिथपर्यंत आग पसरण्यापूर्वीच भुसावळ पालिकेच्या दोन अग्निशमन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

हेही वाचा – नाशिक : आंदोलनानंतर टाकेहर्षची पाणी योजना सुरु, ग्रामस्थांचा आनंदोत्सव

हेही वाचा – नाशिक : म्हाडाकडून नव्याने ५५५ सदनिकांचे वितरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवर काही दिवसांपूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीत अवैधरित्या गॅस भरण्याचे काम सुरू असताना, झालेल्या स्फोटात १० जण होरपळले होते. त्यापैकी सात जणांचा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी वाहनांमध्ये अवैधरित्या घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रांवरील कारवाईला वेग दिला आहे. तशी कारवाई भुसावळ शहरात अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवासी वाहनांमध्ये गॅस संच बसविण्यासह त्यात अवैधरित्या गॅस भरण्याचे प्रकार बिनबोभाटपणे सुरूच आहेत. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.