जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षी आतापर्यंत ३५ कारवाया केल्यानंतर ५६ संशयित जाळ्यात अडकले आहेत. त्यानंतरही लाचखोरी थांबलेली नसून, पारोळा येथील महिला वनपालाच्या विरोधात एक लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वनपाल वैशाली गायकवाड (वर्ग तीन) आणि खासगी इसम सुनील धोबी, अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदाराचा भाऊ त्यांच्या शेतातील निंबाची झाडे तोडून मालमोटारीतून मालेगाव येथे घेऊन जात होता. दरम्यान, वनपाल गायकवाड तसेच वन विभागाचा एक कर्मचारी आणि सुनील धोबी यांनी पारोळ्यात सावित्री फटाका कारखान्यासमोर लाकडाने भरलेली मालमोटार पकडली. त्यासाठी बेकायदेशीर लाकूड वाहतूक केल्याचे कारण वनपाल गायकवाड यांनी पुढे केले. तक्रारदारासह त्यांचा भाऊ यांनी वेळोवेळी भेटून वनपाल गायकवाड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्याला मालमोटार सोडण्याची विनंती केली. मात्र, त्या मोबदल्यात दोन्ही भावांकडे सुरूवातीला सुमारे दोन लाख ५० हजार रूपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती वनपाल गायकवाड आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्याने खासगी इसम सुनील धोबी याच्याकडे एक लाख रूपये देण्यास सांगितले.

अखेर तक्रारदाराने १० डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच, साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान पारोळा येथील श्रीकृष्ण सॉ मिलमध्ये वनपाल वैशाली गायकवाड, वन कर्मचारी आणि सुनील धोबी यांनी तक्रारदाराच्या भावाचा पकडलेली मालमोटार आणि त्यातील मालावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

प्रत्यक्षात, तेव्हा केलेल्या पडताळणीच्या आधारे बुधवारी पारोळा पोलीस ठाण्यात महिला वनपालासह खाजगी इसम आणि एका वन कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि निरीक्षक नेहा सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. सहाय्यक उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक राकेश दुसाणे, बाळू मराठे (जळगाव), हवालदार विनोद चौधरी, परशुराम जाधव (नाशिक), नरेंद्र पाटील आणि सुभाष पावरा (नंदुरबार) यांचा पथकात समावेश होता.

जिल्ह्यात गेल्या वर्षी एकूण ३७ कारवाया लाच स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर करण्यात आल्या होत्या. त्या तुलनेत यंदा ऑक्टोबरअखेर ३५ कारवाया करण्यात आल्या आहेत आणि ५६ संशयित लाच स्वीकारताना जाळ्यात अडकले आहेत. पैकी १३ संशयित हे खासगी इसम असून, उर्वरित सर्व संशयित हे शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचारी आहेत. उल्लेखनीय म्हणजे लाचखोरीच्या प्रकरणात तीन महिलांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात सर्वाधिक १० गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. त्यानंतर महसूल विभागातील सात, पोलीस आणि महावितरणच्या प्रत्येकी चार अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. या व्यतिरिक्त जळगाव महापालिकेसह वन विभागाच्या प्रत्येकी दोन, भूमिअभिलेखसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडाळाच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्याविरोधात लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत. लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले अधिकारी हे वर्ग-एक, वर्ग-दोन आणि वर्ग-तीन प्रकारातील आहेत.