जळगाव – जिल्हा परिषदेचे ६८ गट तसेच पंचायत समित्यांच्या १३६ गणांची प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांकडून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात प्रशासनाने दिलेल्या मुदतीत तब्बल १२१ हरकती गट आणि गणांच्या रचनेवर प्राप्त झाल्या आहेत. त्यांची सुनावणी आता नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे.
जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ६७ गट आणि १३४ गण होते. नवीन गट आणि गणांच्या रचनेनुसार आगामी काळात ६८ गट आणि १३६ गणांसाठी निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले होते. प्रत्यक्षात जिल्हाभरातील १५ तालुक्यांत मुदतीत १२१ हरकती दाखल झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. पैकी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक ४४, चोपड्यात ४२, मुक्ताईनगरात ११, रावेरमध्ये १०, जळगावमध्ये सहा, जामनेरमध्ये सहा, यावल आणि भुसावळमध्ये प्रत्येकी एक हरकत १४ ते २१ तारखेदरम्यान दाखल झाली आहे.
प्राप्त हरकती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अभिप्राय दिल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव नाशिक येथील विभागीय महसूल आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत सादर केला जाईल. त्यानंतर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या सर्व हरकतींवर निकाल देतील. हरकती निकाली निघाल्यानंतर जिल्हा परिषदेचे ६८ गट आणि पंचायत समित्यांच्या १३६ गणांची रचना १८ ऑगस्टपर्यंत निश्चित होईल. राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर गट व गणांच्या रचनेला अंतिम स्वरूप मिळेल. आणि खऱ्या अर्थाने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या हालचाली गतिमान होतील.
यंदा जळगावसह चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा आणि रावेर सात तालुक्यांत लोकसंख्या वाढीसह नगरपरिषद व नगरपंचायत अस्तित्वात आल्यामुळे तसेच पालिका हद्दीत काही गावे समाविष्ट झाल्याने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या रचनेत बदला झाला आहे. एक जुलैअखेर जिल्ह्यात सुमारे ३७ लाख ७२ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्या पैकी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सुमारे २४ लाख दोन हजार ४०२ मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. याशिवाय, १६ नगरपालिकांसाठी आठ लाख ४६ हजार १५४ मतदार, नगरपंचायतींसाठी ४४ हजार ८५९ आणि नगरपरिषदांसाठी सहा लाख १५४ मतदार हक्क बजावतील.