नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षांआड देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार कादंबरीकर, लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.

या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे हेमंत टकले, ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, मकरंद िहगणे, प्रकाश होळकर आदी पदाधिकाऱ्यांनी केली. प्रतिष्ठानतर्फे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकास दर दोन वर्षांतून एकदा जनस्थान पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. मराठी साहित्य आणि संगीतात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. संसार सांभाळून त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी त्यांच्या लेखन शैलीला आकार दिला. नंतर मौज आणि बगे असे समीकरण जुळले. मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललित लेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संगीताची विशेष आवड असणाऱ्या आशाताईंनी त्यावर अनेकदा लिहिलेले आहे. त्यांचे आयुष्य एकत्रित कुटुंबात गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली. पुरस्कार निवड समितीत डॉ. अनुपमा उजगरे, संध्या नरे-पवार, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे आणि अविनाश सप्रे यांचा समावेश होता. साहित्य संपदा : अनंत, ऑर्गन, ऋुतूवेगळे, चंदन, जलसाघर, दर्पण, निसटलेले, पाऊल वाटेवरचे गाव मारवा आदी कथासंग्रह तर प्रतिद्वंद्वी, भूमी, मुद्रा, सेतू या कादंबऱ्याचे लेखन आशा बगे यांनी केले आहे. ‘भूमी’ ला साहित्य अकादमीचा तर ‘दर्पण’ला केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला आहे. मालतीबाई दांडेकर पुरस्कार तसेच राम शेवाळकर यांच्या नावाच्या (पहिला) साहित्यव्रती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली.