धुळे : कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने येथे शनिवारपासून अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाच्या समारोपात २५ मे रोजी कान्हदेश वारकरीरत्न आणि वारकरीभूषण पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी मंत्री आशिष शेलार आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार आहे.
रौप्य महोत्सवी कीर्तन सप्ताह समितीचे अध्यक्ष तथा धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी ही माहिती दिली. अग्रवाल आणि सुनील वाघ यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या ग्रंथराज ज्ञानेेश्वरी पारायण, रौप्य महोत्सवानिमित्ताने १७ ते २५ मे या सात दिवसात धुळ्यातील कॉटन मार्केटमागे प्रीतीसुधाजी हायस्कूलजवळ असलेल्या पवन नगरातील प्रसन्न हनुमान मंदिरात अखंड हरीनाम संकिर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
सप्ताहात १७ मे रोजी सुदर्शन महाराज गायकवाड (गोंदूर), १८ मे रोजी महंत आनंददासजी महाराज (कजवाडेकर), १९ मे रोजी अमृताश्रम स्वामी महाराज (राजुरी, बीड), २० मे रोजी पद्माकर महाराज देशमुख (अमरावती), २१ मे रोजी सुनील महाराज झांबरे (आष्टी), २२ मे रोजी महादेव महाराज राऊत (बीड), २३ मे रोजी मुकूंदकाका महाराज (जाटदेवळेकर), २४ मे रोजी दिनानाथ महाराज सावंत (नामपूर) यांचे काल्याचे कीर्तन होईल. दररोज रात्री आठ ते १० या वेळेत हा कीर्तन सोहळा रंगणार आहे.
कीर्तनाला शिरपूर, नंदुरबार, धुळे, शिंदखेडा, शहादा, नंदुरबार, तळोदा, साक्री तालुक्यातील आणि धुळे शहरातील भजनी मंडळी साथ संगत करणार आहेत. कीर्तन सुरु होण्यापूर्वी संध्याकाळी सहा से सात या वेळात हरिपाठ होईल. २५ मे रोजी संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली (बेलदारवाडीकर), ज्येष्ठ मार्गदर्शक महंत प्रणवगिरी महाराज आणि प्रमुख पाहुणे महंत तुषार भोसले यांच्या उपस्थितीत डॉ. भगवान महाराज (आनंदगड, जालना) यांना कान्हदेश वारकरीरत्न पुरस्कार तर यशवंत महाराज कमळगावकर यांना कान्हदेश वारकरीभूषण पुरस्कार मंत्री आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रदान केले जातील.या सोहळ्याला उपस्थितीचे आवाहन आमदार अग्रवाल, कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भोकरे, कार्याध्यक्ष डॉ.भास्कर पाटील, उपाध्यक्ष हिरामण गवळी, सचिव सुनील वाघ यांनी केले आहे.