जळगाव – शहरालगतच्या जैन हिल्सवरील अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातील ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या होत्या. अखेरीच्या फेरीनंतर मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैन आणि मुलांच्या गटात दिल्लीतील आरित कपिल हे दोघे विजेते ठरले.

विजेत्यांना जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अजितकुमार वर्मा, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, ताजिकिस्तानचे ग्रँडमास्टर फारुक अमातोव, मुख्य ऑरबिटर देवाशीष बारुआ यांच्या हस्ते रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने नऊ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकवला. तिला ७० हजार रूपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. दुसरा क्रमांक केरळमधील दिवी बिजेश हिने मिळवून ६० हजाराचे पारितोषिक पटकावले. तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूतील पूजा श्री राहिली. तिनेही नऊ गुण घेत ५० हजारांचे पारितोषिक पटकावले.

त्रिपुरामधील आराध्य दास चौथी तर  झारखंडमधील दिक्षिता डे ही पाचव्या क्रमांकावर राहिली. त्यांना अनुक्रमे ४० हजार आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. सहाव्या क्रमांकाचे १५ हजाराचे पारितोषिक वंशिका रावल (दिल्ली) हिला मिळाले. त्यानंतर सातव्या ते २० क्रमांकावर विजयी ठरलेल्या सर्व बुद्धिबळपटुंना प्रत्येकी १० हजार रुपयांची रक्कम पारितोषिकाच्या स्वरूपात देण्यात आली.

ज्यामध्ये जानकी एस.डी. (केरळ), समहिता (तेलंगणा), प्रिशा घोलप (महाराष्ट्र), आराध्या उपाध्याय (राजस्थान),  राजनया मंडल (पश्चिम बंगाल), ज्ञानेश्री आर (तामिळनाडू), भूमिका वाघले (महाराष्ट्र), दीपाश्री गणेश (तामिळनाडू), नश्रता (कर्नाटक), राशी वरुडकर (छत्तीसगड), नारायणन रिश्रीथा (आंध्रप्रदेश), अश्रया नरहरी (तेलंगणा), आसावी अग्रवाल ( महाराष्ट्र), दक्षिणा आर (केरळ) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलांच्या लढतीत दिल्लीत आरित कपिल याने ९.५ गुण घेत ७० हजार रुपयांचे पहिले पारितोषिक पटकावले. दुसरा क्रमांक पश्चिम बंगालमधील वोशिक मंडल याने मिळवला. त्यानेही नऊ गुण घेत ६० हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले. तिसरा क्रमांक महाराष्ट्रातील अद्वित अग्रवाल याने ८.५ गुण घेत मिळवला. त्याला ५० हजारांचे पारितोषिक मिळाले.

पश्चिम बंगलामधील नरेंद्र अग्रवाल आणि मनी सरबोथो यांनी अनुक्रमे चौथा आणि पाचवा  क्रमांक मिळवला. त्यांना ४० आणि २५ हजाराची पारितोषिके मिळाली. हरियाणामधील व्योम मल्होत्रा यानेही १५ हजार रूपयांचे पारितोषिक जिंकले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. आभार प्रविण ठाकरे यांनी मानले.