जळगाव – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजेरी लावत असलेल्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसाने उघडीप दिल्यानंतर कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाल्याच्या विकृतीमुळे कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने यंदाच्या खरिपात कपाशीचे क्षेत्र जवळपास २१ टक्क्यांनी घटले आहे. सध्या बोंडे परिपक्वतेच्या अवस्थेत असलेल्या कपाशीवर पाऊस थांबल्यानंतर लाल्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हिरवी पाने अचानक लाल पडू लागल्याचे लक्षात घेता शेतकऱ्यांनी उपाययोजनांवर देखील दिला आहे. जळगाव येथील कापूस संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या मते, कपाशी पिकावरील लाल्या हा रोग नसून ती एक प्रकारची विकृती आहे. अशा प्रकारची विकृती अमेरिकन संकरीत बीटी वाणावर मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पाण्याचा ताण पडणे, जमिनीत वाजवीपेक्षा जास्त पाणी साठणे म्हणजेच जमिनीत वाफसा परिस्थिती नसणे, तापमानातील बदल, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तसेच नत्र आणि मॅग्नेशियम या सारख्या अन्नद्रव्यांचा असमतोल, ह्या प्रमुख कारणामुळे कपाशी पिकावर लाल्याची विकृती दिसून येते.

लाल्यावर उपाययोजना काय ?

कपाशीवर लाल्याच्या विकृतीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पीक लागवडीच्या सुरूवातीपासून एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करावा. लागवडीच्या आधी सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खतांची वापर करावा. तसेच ॲझेटोबॅक्टर तसेच स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. रासायनिक खते देतांना योग्य वेळी योग्य पद्धतीने आणि योग्य मात्रेत द्यावी. कपाशीत पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आल्यास पाण्याचा तातडीने पाण्याचा निचरा करणे आवश्यक आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एक सरी आड सरी पाणी देण्याची व्यवस्था करावी. वाफसा स्थिती असल्यास हलकी कोळपणी करावी. पिकाला मातीची भर लावणे देखील आवश्यक आहे. नत्राचा शेवटचा हप्ता दिलेला नसल्यास एकरी ४० ते ५० किलो युरिया द्यावा. मँग्नेशिअम सल्फेट २० ते ३० किलो हेक्टरी वापरावे. तसेच दोन टक्के डीएपी किंवा विद्राव्य खतांची फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १०-१५ दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात, असा सल्ला जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राने दिला आहे.

कपाशीच्या पिकात बोंडे पोसण्याच्या अवस्थेत लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. -डॉ. गिरीश चौधरी (पैदासकार- कापूस संशोधन केंद्र, जळगाव)