कुंभमेळ्यातील नाशिकची तिसरी शाही पर्वणी शुक्रवारी होत असून ही अखेरची पर्वणी असल्याने गोदावरीत स्नानाचा योग साधण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविक व शहरवासीयांना ही पर्वणी सुसह्य व्हावी, यासाठी दुसऱ्या पर्वणीच्या धर्तीवर झालेल्या फेर नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे स्नानासाठी गोदाघाटावर पोहोचण्यासाठी भाविकांना कमीत कमी पायपीट करावी लागेल. तसेच वाहन विरहित क्षेत्र वगळता शहरवासीयांना इतरत्र मुक्तपणे भ्रमंती करता येईल. लोखंडी जाळ्यांद्वारे होणाऱ्या नाकाबंदीला कमीत कमी तोंड द्यावे लागणार आहे. काही विशिष्ट भागांत बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
दर बारा वर्षांंनी होणाऱ्या कुंभमेळ्याला १४ जुलै रोजी पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाद्वारे सुरूवात झाली. त्यानंतर २९ ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी अनुक्रमे प्रथम व द्वितीय शाही स्नान पार पडले. या पर्वातील विशेष महत्व असणारे अंतीम अर्थात तृतीय शाही स्नान शुक्रवारी होत आहे. पहिल्या पर्वणीत कडेकोट बंदोबस्तावरून पोलीस यंत्रणेला टिकेचे धनी व्हावे लागले. भाविकांना गोदावरीच्या घाटाकडे येण्यासाठी १० ते १५ किलोमीटर पायपीट करावी लागली. अंतर्गत बससेवा नसल्याने रिक्षा चालकांनी त्यांची लुटमार केली. शहरवासीयांना घरात स्थानबध्द व्हावे लागल्याची ओरड झाली. यामुळे दुसऱ्या पर्वणीत नियोजनात अनेक फेरबदल करण्यात आले. पोलिसांनी वाहन विरहित क्षेत्र वगळता इतर भागात लोखंडी जाळ्यांची फारशी तटबंदी राहणार नाही, याची दक्षता घेतली. भाविकांना शहरात येण्यासाठी १०० बसेसची व्यवस्था केली गेली. नागरिकांना दुचाकी घेऊन भ्रमंती करण्याची मुभा देण्यात आली. व्यावसायिक वा इतर दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू रहावेत यासाठी विशेष प्रयत्न केले. साधू-महंतांचे शाही स्नान झाल्यानंतर भाविकांना रामकुंड व परिसरातील घाटावर स्नानासाठी मुक्तपणे सोडण्यात आले. दुसऱ्या पर्वणीत लाखो भाविकांनी स्नान केले. ही बाब लक्षात घेऊन तिसऱ्या पर्वणीला भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शाही पर्वणी तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले. नाशिकच्या तीन आखाडय़ांची शाही मिरवणूक व स्नान सकाळी दहापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. गतवेळी त्यास एक ते दीड तास विलंब झाला होता. मिरवणुकीत मोठय़ा संख्येने भाविक शिरल्याने प्रचंड गर्दीमुळे बिकट स्थिती निर्माण झाली होती. साधू-महंतांच्या शाही स्नानासाठी रामकुंड परिसर पहाटे तीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत भाविकांना स्नानासाठी बंद राहणार आहे. सकाळी सहा वाजता साधुग्राममधून शाही मिरवणुकीला सुरूवात होईल. दुसऱ्या मिरवणुकीप्रमाणे यावेळी आखाडय़ांचा क्रम राहणार आहे. निर्मोही अनि आखाडा पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. दिगंबर अनि आखाडय़ाची साडे सहा वाजता तर निर्वाणी अनि आखाडय़ाची सकाळी सात वाजता मिरवणूक निघेल आणि दहा वाजेपर्यंत शाही स्नान पूर्ण करण्यासाठी वेळ दिला गेला आहे. साधू-महंतांच्या स्नानानंतर रामकुंड भाविकांसाठी खुले केले जाईल. अंतीम पर्वणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच वेगवेगळ्या भागात बसविलेल्या शेकडो सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे.