जळगाव – जिल्ह्यातील वाळू तस्करी थांबवण्यात पोलीस व महसूल विभागाला अपयश आले असताना, जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात संशयास्पदरित्या आढळलेल्या वाळू आणि खडी साठ्यावर ‘लोकसत्ता’ ने प्रकाश झोत टाकला. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने तेथील गौण खनिज साठ्याचा रितसर पंचनामा केला आहे. संबंधित विभागाला आता नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेक कारणांनी वाळू ठेक्यांचा विषय बारगळला असताना, त्याचा गैरफायदा घेऊन वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात असली, तरी वाळू तस्करी बिनबोभाटपणे सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत, जळगावमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सध्या पडून असलेला वाळू साठा चांगलाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकसत्ता’ ने प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाची यंत्रणा लगेच कामाला लागली. तहसीलदार शीतल राजपूत यांच्या आदेशानुसार मेहरूण भागाचे मंडळ अधिकारी राजेश भंगाळे यांनी ग्राम महसूल सहाय्यक राहुल कुमावत आणि ईश्वर मराठे यांना तातडीने खात्री करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात पाठवले.
ग्राम महसूल सहाय्यकांनी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी समोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात सुमारे २० ब्रास वाळू आणि २० ब्रास खडी आढळून आली. चंद्रशेखर सोनवणे आणि अमोल सोनवणे यांच्या समक्ष वाळू तसेच खडीच्या साठ्याचा पंचनामा पूर्ण करण्यात आला. वाळू आणि खडीच्या साठ्याच्या गौण खनिज परवान्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता, अधिकाऱ्यांकडून तसा कोणताच परवाना दाखवण्यात आला नाही. अशाच प्रकारे जळगाव शहर व परिसरात बऱ्याच ठिकाणी वाळुचे अवैध साठे आढळून आले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील तापी, गिरणा तसेच इतर लहान-मोठ्या नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने डंपर, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने थेट नदीपात्रात नेण्यास बंदी घातली होती. तरी सुद्धा वाळू तस्करीवर आळा बसला नाही. ही स्थिती पाहता स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी काही दिवसांपूर्वी कारवाईचे पाऊल उचलले होते; परंतु, कारवाईत नंतरच्या काळात सातत्य न राहिल्याने वाळू माफियांना पुन्हा वाव मिळाला. विशेषतः जळगाव शहरालगतच्या गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील वाळू आणि खडीच्या साठ्याचा पंचनामा केला आहे. आता संबंधित विभागाला नोटीस बजावून त्या संदर्भात खुलासा मागविण्यात येईल. उत्तर मिळाल्यावर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. – शीतल राजपूत (तहसीलदार, जळगाव).