विषयांतील वैविध्य, मांडणीतील नाविन्य आणि लेखकाला अभिप्रेत असलेला उद्देश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची विद्यार्थ्यांची धडपड ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या पहिल्या दिवशी, नाशिक केंद्रात दिसली. नाशिक केंद्रात सोमवारी सादर झालेल्या एकांकिकांच्या सादरीकरणात शहरी तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी जीव ओतण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला महाकवी कालिदास कलामंदिरातील नाटय़ परिषदेच्या सभागृहात सुरूवात झाली. सकाळी परीक्षक राजीव जोशी आणि हेमा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर  भोसला कनिष्ठ महाविद्यालयाने ‘खेळ तारूण्याचा’ एकांकिकेद्वारे वृद्धांचे पालकत्व या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

के.टी.एच.एम. महाविद्यालयाने ‘खोल दो’ मधून  फाळणीच्या दुष्परिणामांवर भाष्य केले. धुळे येथील झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या ‘व्हटांडा’ने  महाविद्यालयांतील वादांचे चित्र मांडले. न. ब. ठाकूर विधि महाविद्यालयाने ‘मिसा’ एकांकिकेत १९७२ मध्ये लादलेली आणीबाणी आणि सद्यस्थिती याची गुंफण महाविद्यालयीन जीवनाच्या संदर्भाने घातली आहे.  मालेगाव येथील म. स. गा. महाविद्यालयाने ‘सुसाईड ब्रीज’ मध्ये आत्महत्येसारख्या ज्वलंत विषयाकडे उपहासात्मक पद्धतीने लक्ष वेधले.

आजच्या एकांकिका

आज, मंगळवारी हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयाची ‘या ठिकाणी..त्या ठिकाणी’, एस.व्ही.के.टी. महाविद्यालयाची ‘नि:शस्त्र योध्दा’, धुळे येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची ‘रात्र वैऱ्याची’, स्मिताताई हिरे कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टसची ‘मनमोहन सिंग’, पंचवटी महाविद्यालयाची ‘मी-टू’ या एकांकिका सादर होतील.

प्रतिक्रिया

लोकांकिका स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा अभिनय उत्कृष्ट होता. भविष्यातील चांगले कलाकार त्यांच्यात दिसत आहेत. त्यांनी दिग्दर्शनही छान केले. मात्र अनेक स्पर्धकांनी पठडीतील- चाळींमधील विषय निवडले होते. त्याऐवजी इतरही चांगल्या विषयांवर त्यांना एकांकिका सादर करता आल्या असत्या. विद्यार्थ्यांनी एकांकिका लेखनावरही थोडे काम करायला हवे.- सुरेश जयराम, परीक्षक

जगण्यातले गुंते, सामाजिक परिस्थितीचे भान, मानवी मनाचे सामान्य गुणदोष आणि मर्यादा याची उत्तम जाणीव या स्पर्धेत होती. भाषेचा गोडवा अनुभवायला मिळाला. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेमुळे या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतील, हे या स्पर्धेचे यश आहे. –विश्वास सोहोनी, परीक्षक

वैविध्यपूर्ण विषय आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याची या विद्यर्थ्यांची हातोटी कौतुकास्पद आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि निवडलेले विषय वाखाणण्यासारखे होते.  -रागिणी चुरी, आयरिस प्रोडक्शन.

आधी बालनाटय़ करायचो. यावर्षी पहिल्यांदाच एकांकिका करतोय. एकांकिकांमध्ये काम करताना मजा येत आहे. पहिल्यांदाच एकांकिकेत काम करत असल्याने अभिनयावर मेहनत घ्यावी लागली. -आर्य आढाव, महर्षी दयानंद महाविद्यालय, परेल (अर्ध विराम).

गेल्या वर्षी पहिल्यांदा लोकांकिकेत सहभागी झालो होतो. यावर्षी अधिक ताकदीने उतरलो आहे. आम्ही दहा ते बारा तास तालीम केली. दिग्दर्शकही उत्तम लाभला. सर्वानी मेहनत घेतली आहे. लोकांकिका स्पर्धेमुळे आम्हाला एक व्यासपीठ मिळाले आहे. – प्रणेश लोगडे, राम नारायण रु ईया महाविद्यालय (बुद्रुकवाडीचा मारुती बाटला).

पहिल्यांदाच एवढय़ा मोठय़ा स्टेजवर पाऊ ल ठेवले. या स्पर्धेमुळे अभिनयाविषयी बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. ही स्पर्धा असली तरी आम्ही हसत- खेळत तयारी केली. त्यामुळे ताण जाणवला नाही.- तृषांतू बोबडे, कीर्ती महाविद्यालय (ठसका).

एका वेगळ्या विषयावर एकांकिका केली. ती फुलवताना बराच काथ्याकूट केला. आम्ही एकांकिका उत्तम रीतीने सादर करण्याचा प्रयत्न केला. लोकांकिका स्पर्धेमुळेच आम्हाला एकांकिकांचे वेड लागले. या स्पर्धेतून बऱ्याच गोष्टी शिकता येतात.- मल्लिका जाधव, गुरुनानक खालसा महाविद्यालय, माटुंगा (आम्याची गोम्याची). 

आम्ही सर्व क्षमतांनिशी तयारी केली आहे. बॅकस्टेजपासून ते अभिनयापर्यंत सर्वानी झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळेच आम्ही प्राथमिक फेरीत चांगले सादरीकरण करू शकलो.-पूनम सावंत, मुलुंड वाणिज्य महाविद्यालय (भाग    धन्नो भाग).

लोकांकिका स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेत आहे. प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मनावर थोडे दडपण होते. मात्र सर्वानी प्रोत्साहन दिले. चुका सांगितल्या. त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकले. – दक्षता जोईल, साठय़े महाविद्यालय (भूमी).

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika nashik division round akp
First published on: 10-12-2019 at 03:01 IST