गीतकार संदीप खरे यांची उपस्थिती
आपल्या शैलीदार भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राची वक्तृत्वाची परंपरा पुढे नेण्यासाठी नाशिकमधील नव्या दमाचे शिलेदार सज्ज झाले आहेत. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय स्पर्धेची नाशिक विभागीय अंतिम फेरी मंगळवारी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. प्राथमिक फेरीचे आव्हान पार केलेल्या ११ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमातील गायक व गीतकार संदीप खरे अंतिम फेरीदरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
‘जनता बँक’ आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या नाशिक विभागीय प्राथमिक फेरीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण मत मांडत शहरी भागाच्या तोडीस तोड कामगिरी केली. विषयातील वैविध्य, मांडणीतील वेगळेपण यामुळे प्राथमिक फेरी चांगलीच रंगली. या स्पर्धेचा दुसरा टप्पा विभागीय अंतिम फेरीने सुरू होणार आहे. प्राथमिक फेरीत ६२ स्पर्धकांनी आपले विचार मांडले. त्यातील ११ स्पर्धक विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेस युनिक अकॅडमी आणि स्टडी सर्कल नॉलेज पार्टनर आहेत. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सायंकाळी सहा वाजता स्पर्धा सुरू होईल. साहित्य क्षेत्राबरोबर वक्तृत्वातही ठसा उमटविणारे दिग्गज परीक्षण करतील.