नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लढल्या गेलेल्या आणि अटीतटीमुळे रंगतदार ठरलेल्या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. देवळय़ात एकहाती सत्ता मिळवणारा भाजप सुरगाण्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला. तर निफाड नगर पंचायतीत शिवसेना, काँग्रेस आणि बसपाच्या निफाड शहर विकास आघाडीने सत्ता कायम राखत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना झटका दिला. भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील कळवण येथे महाविकास आघाडीने सत्ता राखली. सहा नगरपंचायतीत स्वबळावर उतरलेल्या भाजपने सर्वाधिक ३० जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रवादी २८ जागा मिळवून द्वितीय क्रमांकावर राहिली. महाविकास आघाडीच्या एकूण जागा जास्त दिसत असल्या तरी काही नगरपंचायतीत सेना-राष्ट्रवादी परस्परांविरोधात लढले.

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. करोनाची नियमावली बासनात गुंडाळून ठेवली. काही जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित जागांवरील मतदान आणि मतमोजणीअंती प्रत्येक नगरपंचायतीतील चित्र स्पष्ट झाले. सहाही नगरपंचायतीच्या निकालावर नजर टाकल्यास भाजप ३०,राष्ट्रवादी २८, शिवसेना २५, काँग्रेस सहा, सीपीएम पाच, बसपा एक, मनसे एक, शहर विकास आघाडी चार, अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे.

sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

* निफाडमध्ये विद्यमान आमदारास धक्का

निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी निफाड शहर विकास आघाडी अर्थात शिवसेना,काँग्रेस आणि बसपने १४ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. निफाड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने पक्षाला येथून बरीच अपेक्षा होती. परंतु आ. दिलीप बनकर यांच्या आशेवर शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या खेळीने पाणी फेरले गेले. राष्ट्रवादीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला खाते उघडता आले नाही. आजी-माजी आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

* देवळय़ात भाजपचे वर्चस्व

भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या देवळय़ात सर्वाधिक १५ जागा जिंकून भाजपने सत्ता कायम राखली. विरोधी राष्ट्रवादीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना, काँग्रेस आणि अन्य पक्षांना खातेही उघडता आले नाही. भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी निवडणुकीत लक्ष घातले होते. भाजप-राष्ट्रवादीत मुख्य लढत झाली. पण ती एकतर्फीच असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. निकालानंतर जिल्ह्यात भाजप सर्वाधिक जागा मिळवून अव्वल ठरल्याची प्रतिक्रिया केदा आहेर यांनी व्यक्त केली.

सुरगाण्यात भाजपला अधिक जागा

सुरगाण्यात १७ पैकी आठ जागा जिंकत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. पण सत्तेच्या भोज्याला कोण शिवणार याची स्पष्टता झालेली नाही. शिवसेनेला सहा, माकपला दोन आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले. निकालानंतर भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

* कळवणमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व

कळवण नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी नऊ जागा मिळवत राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. भाजपला दोन, शिवसेनेला दोन, काँग्रेसला तीन तर मनसेला एक जागा मिळाली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातील या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. तथापि, निकालातून तसे समोर आले नाही. राष्ट्रवादीने नगरपंचायतीवर एकहाती वर्चस्व राखले.

* दिंडोरीत सेना वरचढ

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मतदार संघातील िदडोरी नगरपंचायतीत राष्ट्रवादीला पाच, शिवसेनेला सहा तर काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला. भाजपचे उमेदवार चार जागांवर विजयी झाले. या नगर पंचायतीत निकालानंतर सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

* पेठमध्ये राष्ट्रवादी

पेठ नगरपंचायतीत १७ जागांपैकी आठ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. शिवसेनेला चार तर माकपला तीन जागा मिळाल्या. भाजपच्या पदरात एक जागा पडली.