नाशिक : सटाण्यातील आरम नदीकिनारी वसलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील ऐतिहासिक मूर्तीचे शास्त्रशुद्ध जतन व संवर्धन यशस्वीपणे करण्यात आले. मिट्टी फाउंडेशनच्या सहकार्याने हे काम करण्यात आले. महालक्ष्मी मूर्ती ही दुर्मिळ तैलांगी अखंड पाषाणातील असून, तिचे सौंदर्य, स्थापत्य आणि धार्मिक महत्त्व उल्लेखनीय आहे.
ही मूर्ती इ.स. १५९० मध्ये बागलाणातील मुल्हेर गडावरील बागूलराजे नारायण शहा राठोड यांनी झंझ राजा यांच्याकडून आणून प्रतिष्ठापना केली होती. पुढे मुघल आक्रमणाच्या काळात भाविकांनी ही मूर्ती सुरक्षितपणे मोती टाक्यात लपवली होती. १८७५ मध्ये श्री यशवंतराव देवमामलेदार महाराजांनी मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. पुरातन मूर्ती असल्याने मूर्तीवर पाण्याचा, आर्द्रतेचा आणि प्रदूषणाचा थेट परिणाम होत असल्याने तिची झीज जलद होत होते.
अनेक ठिकाणी तडे, बारीक भेगा आणि जैविक वाढ दिसू लागल्याने मूळ रचना न बदलता आणि कोणतेही कृत्रिम रासायनिक घटक न वापरता नैसर्गिक द्रव्यांद्वारे संवर्धन करण्याचे आव्हान होते. अशा स्थितीत फाउंडेशनच्या वतीने ड्राय ब्रशिंग, स्टीम क्लिनिंग, बायोडल ट्रीटमेंट , हायड्रोफोबिक ट्रीटमेंट या प्रक्रियांचा वापर करण्यात आला. अशा प्रकारे संवर्धन करताना यामधे मुख्यत; वातावरणातील बुरशी आणि जीवाणूंची वाढ थांबविण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना करण्यात आली.
यामुळे मूर्तींचे आयुर्मान अनेक दशकांनी वाढणार आहे. संवर्धनामुळे मूळ मूर्तीच्या अंतर्भागापर्यंत संरक्षण झाले असून तिचे आयुष्य अनेक दशक वाढू शकते. सर्व उपचार भविष्यात बदल करता येईल, अशा सुरक्षित पद्धतीने केले गेले. या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केलेला नाही. या सर्व प्रक्रियेनंतर मूर्ती अखेर दर्शनासाठी खुली झाली आहे.
मूर्तीचे स्वरूप
उभ्या महालक्ष्मी मूर्तीच्या डोक्यावर धम्मिला मुकुट धारण आहे. मुकुटावर सर्वात वर सूर्य चंद्र प्रतिमा आहे. त्याखालील थरात शिवलिंग आहे. मुकुट अनंतनागवेष्टीत आहे. कपाळावर लतावल्लिका असून कानात सूर्यवृत्त प्रकारातील मकर कुंडले धारण केली आहे. स्मितहास्य असलेले मुखमंडल अत्यंत लोभस आहे. देवीने उजव्या बाजूच्या एका हातात महाळुंग फळ पकडलेले आहे. वरील हातातील तर्जनी मुद्रेत कौमोदीकी गदा आहे.
डावीकडील वरील हातात कटक मुद्रेत ढाल आहे. डावीकडील खालच्या हातात सूचीमुद्रेत अमृतपात्र-पानपात्र धारण केलेले आहे. कटी वस्त्रांवर कटिसूत्र, उरुद्दाम, मुक्त्दाम, वनमाला व यज्ञोपवीत धारण केलेले आहे. हातामध्ये भरजरी कडे आणि पायात पैंजण आहे.
शहर आणि जिल्ह्यातील अनेक प्राचीन धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या मूर्ती आणि मंदिराचे संवर्धन होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या मूर्तींबाबत कोणाला माहिती असेल किंवा संवर्धनासाठी मदत हवी असेल तर मिट्टी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना योग्य ती मदत केली जाईल. याआधी वेगवेगळ्या पुरातन मंदिरांसाठी काम केले आहे. सटाणा येथील महालक्ष्मी मूर्ती संवर्धनात वेगवेगळ्या अडचणी होत्या. परंतु, ग्रामस्थ आणि अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून या अडचणी पार केल्या. – मयूर मोरे (शिल्पकार आणि तज्ज्ञ कला संवर्धक. मिट्टी फाउंडेशन, नाशिक)