नाशिक : आपल्याच एका जुन्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्री माणिक कोकाटे पुन्हा एकदा ‘चक्रव्यूहा’त अडकले. ‘शेतकऱ्यांकडून शासन एक रुपया घेते, आम्ही एक रुपया देत नाही. त्यामुळे भिकारी कोण, तर शासन आहे, शेतकरी नाही,’ या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, सरकार एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देते,’ या कोकाटेंच्या वाक्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यावर मंगळवारी नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी उपरोक्त विधान केले. लग्नसोहळ्यांवर जास्त खर्च करू नये, या उद्देशाने आपण शेतकरीच नव्हे तर, सर्वांना उद्देशून सल्ला दिला होता, अशी सारवासारवही कोकाटे यांनी यावेळी केली.
मात्र सरकारला भिकारी संबोधण्याच्या त्यांच्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला असून विरोधकांनी टीका करत राजीनाम्याच्या मागणीचा आवाज मंगळवारी आणखी वाढवला. हा असंवेदनशीलतेचा कळस असून कृषिमंत्री महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत असताना असे बेजबाबदार कृषिमंत्री राज्याने कधीही पाहिले नव्हते, अशा शब्दांत राष्ट्रवादी (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी तोफ डागली. शासनकर्ते आणि जनतेने कठोर परिश्रम करून महाराष्ट्राला देशातील सर्वांत संपन्न राज्य बनविले. त्या राज्याला भिकारी म्हणणे हा असंवेदनशीलतेचा कहर असल्याचे त्या म्हणाल्या.
मंत्र्याने असे बोलणे चूकच – मुख्यमंत्री
गडचिरोली : कोकाटे यांच्या नव्या वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नापसंती दर्शविली. “त्यांनी असे विधान केले असेल, तर एका मंत्र्याने अशा पद्धतीने बोलणे गैर आहे,” असे फडणवीस म्हणाले. पीक विमा योजनेत आम्ही काही सुधारणा केल्या, कारण पूर्वी शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांनाच फायदा होत होता. कृषिक्षेत्रात ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी सरकारने पावले उचलेली आहेत. आव्हाने असली, तरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था उत्तम असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.