जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असताना प्रशासनाला त्यावर आजतागायत नियंत्रण मिळविता आलेले नाही. वाळू माफिया अजिबात जुमानत नसल्याने खुद्द जिल्हाधिकारी हतबल झाले आहेत. अशा स्थितीत थेट गिरणा नदीच्या पात्रात उडी घेऊन पोहत पोहत वाळू माफियांचा पाठलाग करण्याचे धाडस धरणगावच्या तहसीलदारांनी केले. त्यांचा तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात तापीसह गिरणा व इतर लहान-मोठ्या नद्यांच्या वाळू घाटांचे लिलाव गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहेत. नद्यांमधील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी डंपर तसेच ट्रॅक्टरसारखी वाहने थेट नद्यांमध्ये नेण्यास बंदी घातली होती. त्यानंतरही वाळू तस्करी नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात घेऊन स्वतः जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांनी कारवाईचे पाऊल उचलले होते. मात्र, कारवाईत सातत्य न राहिल्याने वाळू तस्करांना पुन्हा मोकळे रान मिळाले. शहरालगतच्या गिरणा नदीपात्रात विशेषतः अवैध वाळू उत्खनन दिवसेंदिवस भयावह स्वरूप धारण करत आहे. वाळू माफियांनी नदीपात्राचे अक्षरशः विद्रुपीकरण केले असून, मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रशासनाकडून अधूनमधून कारवाया केल्या जात असल्या, तरी त्या केवळ औपचारिकतेपुरत्याच मर्यादित राहिल्याने वाळू माफियांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच आहे.

हाजिरा ते कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी गावाजवळील पुलालगतही मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाढली आहे. अशा या परिस्थितीत, धरणगाव येथील तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना वाळू माफियांचा पाठलाग करण्यासाठी केलेल्या धाडसाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सूर्यवंशी हे जळगाव येथे आयोजित प्रशासकीय बैठक आटोपून धरणगावकडे महामार्गावरील बांभोरी पुलावरून जात होते. त्याच वेळी गिरणा नदीच्या पात्राकडे लक्ष गेल्यावर त्यांना असंख्य ट्रॅक्टर वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करताना दिसून आले. त्यांनी ही गंभीर बाब लक्षात घेत क्षणाचाही विलंब न करता थेट गिरणा नदी पात्रात उतरून पोहतच वाळू माफियांचा पाठलाग केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, तहसीलदार सूर्यवंशी आपल्याकडे पोहत पोहत येत असल्याचे लक्षात येताच सर्व वाळू माफियांनी नदी पात्रातून वाट मिळेल तिकडे पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे देखील त्यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. तहसीलदारांच्या धाडसाचे नागरिकांमधून कौतुक होत असले, तरी वाळू माफियांवर कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षाही व्यक्त होत आहे.