धुळे : शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या सहकारी बँकेचे काही अधिकारी, कर्मचारी, माजी चेअरमन आणि कर्जदार अशा ४६ जणांनी संगनमत करून तब्बल १३,७५,८६,२५३ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आर्थिक घोटाळ्यातला प्रमुख सूत्रधार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या या संशयिताकडून पोलिसांना या गुन्ह्यातील महत्वाची माहिती मिळू शकेल असे म्हटले जाते आहे. बँकेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यावर तत्कालीन कर्ज अधिकारी महेश उर्फ गोपाल पंडितलाल गुजराथी हा फरार झाला होता. त्याच्याकडूनच या गुन्ह्याची महत्वाची माहिती पोलिसांना मिळणार असल्याचे पोलिस त्याच्या शोधात होते. शिरपूर पोलिसांनी अखेर त्याला अटक केली असून, या अटकेमुळे या बहुचर्चित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.
शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटीव्ह बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमित कर्जवाटप, बनावट कर्जांची निर्मिती आणि खात्यांत फेरफार करून ठेवीदारांच्या पैशांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. याप्रकरणी बँकेच्या लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून २५ मे २०२५ रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, बँकेचे काही अधिकारी, कर्मचारी, माजी चेअरमन आणि काही कर्जदार अशा जवळपास ४६ जणांनी संगनमत करून तब्बल १३,७५,८६,२५३ रुपयांचा अपहार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बनावट कर्ज खाते उघडणे, नियमबाह्य कर्जवितरण आणि कागदपत्रांमध्ये फेरफार, बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक अशा स्वरूपाच्या बेकायदेशीर कृतीतून हा गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचा प्रकार झाल्याचे उघडकीस आल्यावर तपास अधिकारीही थक्क झाले होते.
गुन्हा दाखल होताच अनेक आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी मात्र त्यांच्या मागावर राहून कर्जदार जयपाल विजयसिंग गिरासे, भुषण अरुण चौधरी आणि निखील अशोक अग्रवाल अशा काही संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर आता कर्ज अधिकारी महेश उर्फ गोपाल गुजराथीच्या अटकेनंतर या गुन्ह्याच्या तपासलागला अधिक गती मिळाली आहे. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार या आरोपीकडून चौकशीदरम्यान आणखी महेश गुजराथी याच्याकडून बँकेच्या व्यवहारात झालेल्या आर्थिक अनियमिततेसह गैरव्यवहाराचे अन्य प्रकारही उघड होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटीव्ह बँकेवरील ठेवीदारांचा विश्वास डळमळीत झाला असून, संपूर्ण परिसरात या घोटाळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
या गुन्ह्यात संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४०३ (अपहार), ४०९ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), १२०(च) (कटकारस्थान) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
