नाशिक – जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पावसाने द्राक्षासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीत द्राक्षांसह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे भुसे यांनी पाहणी केली.
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गारपीट, अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून नेला. शेतात आलेल्या पालकमंत्र्यांसमोर पिकांची स्थिती मांडत शेतकऱ्यांनी अस्वस्थता प्रगट केली. भुसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना धीर दिला. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीक विमा कंपनीकडे नोंदणी करावी, असे सूचित केले. कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये आणि नुकसानग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भुसे यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, कृषी विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा – नाशिक : अवकाळी, गारपिटीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, द्राक्ष, कांदा, भात भुईसपाट
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार – सुहास कांदे
नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करू नये. सरकार तुमच्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळवून दिली जाणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी म्हटले आहे. नांदगाव तालुक्यातील जोंधळवाडी, शास्त्रीनगर, धोटाणे, नागापूर, पानेवाडी परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले. बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून कांदे यांनी माहिती जाणून घेतली. लवकरात लवकर भरपाई मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नांदगाव तालुक्यात गेल्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ आणि आता गारपीट असे तिहेरी संकट कोसळले आहे. तालुक्यात पशूधन, घरे, कुक्कुटपालन केंद्रांसह मका,कापूस, कांदा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळेल. पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच सरकारकडून मदत जाहीर होईल, असे कांदे यांनी सांगितले.
उत्पन्नाविना द्राक्ष बागा सांभाळण्याची वेळ
अवकाळी पाऊस, गारपिटीत जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका द्राक्ष आणि कांद्याला बसला. काही भागांत पूर्णत: नुकसान झाल्यामुळे बागा तोडून टाकणे आणि वर्षभर उत्पन्नाविना त्या सांभाळण्याची वेळ उत्पादकांवर ओढावली आहे. परिपक्व होण्याच्या अवस्थेतील नवीन लाल कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम होऊन दर कमी होण्याची शक्यता धूसर होणार आहे. निफाड, दिंडोरी, नाशिकसह आसपासच्या भागातील द्राक्ष बागा छाटणीपासून ते साखर उतरण्याच्या टप्प्यात होत्या. गारपिटीने त्यांचे पूर्णत: नुकसान झाले. हे नुकसान इतके प्रचंड आहे की, यंदाच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. काही बागा तोडून टाकण्याच्या अवस्थेत आहेत. तर काही बागा सांभाळण्यासाठी उत्पन्नाविना वर्षभर खर्च करावा लागणार असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे यांनी सांगितले.
हेही वाचा – मनपा आयुक्त म्हणतात, नाशिक कुठे गरीब आहे ?
कांद्यावर परिणाम कसा ?
नवीन लाल कांदा काढणीवर येण्याच्या मार्गावर असतानाच पावसाने एका झटक्यात सर्व होत्याचे नव्हते केले. साडेदहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे तर सुमारे ५०० हेक्टरवरील कांदा रोपे देखील भुईसपाट झाली. घाऊक बाजारात उन्हाळ कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे नव्या लाल कांद्यावर सर्वांची भिस्त होती. अवकाळीने कांदा उत्पादनाचे गणित विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी, उशिराच्या खरिपाचा म्हणजे लाल कांदा निघण्याची ही वेळ होती. देठात पाणी जाऊन तो खराब होईल, असे सांगितले. ज्या भागात पाऊस झाला, तेथील आवकवर परिणाम होईल. त्यामुळे कांद्याचे दर सध्या आहेत त्या पातळीवर किंबहुना वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. उन्हाळ कांदा लागवडीसाठी तयार रोपे भुईसपाट झाल्यामुळे पुन्हा तयार करावी लागणार आहे.