नाशिक : सप्टेंबर २००८ मध्ये रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मालेगाव येथील भिकू चौक परिसरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांकडून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) हाती घेतला. येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. त्यामुळे या खटल्याची सुरुवातीची न्यायालयीन प्रक्रिया नाशिकच्या न्यायालयात पार पडली.

तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या घटनेचा तपास प्राथमिक टप्प्यात होता. हा नक्की काय प्रकार आहे, यामागे कोण आहेत, याचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणा करीत होत्या. घटनास्थळावरील वाहन कोणाचे, घटनास्थळावरून हस्तगत केलेल्या विविध वस्तुंचे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेतील अहवाल मिळविण्याचे काम प्रगतीपथावर होते. या प्रकरणात एकेका संशयितांना जशी अटक झाली, तसे त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर करून एटीएस कोठडी मागण्यात आली. दीड ते दोन वर्ष मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचे कामकाज नाशिकच्या न्यायालयात चालले होते, असे एटीएसचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.

मालेगाव बॉम्बस्फोटातील भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह सात संशयितांची विशेष न्यायालयाने मुक्तता केली आहे. या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग होण्यापूर्वी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करीत होते. मालेगाव शहरातील भिकू चौक भागात बॉम्बस्फोट झाला होता. यात सात जणांचा मृत्यू झाला तर, शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पुढे नेण्यात आला.

निकालाच्या पार्श्वभूमीवर, एटीएसचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नाशिक येथील न्यायालयात या खटल्याची चाललेली सुरुवातीची प्रक्रिया नमूद केली. न्यायालयात ॲड. मिसर हे एटीएस अर्थात सरकारी पक्षाची बाजू मांडत होते. संशयितांना अटक झाल्यानंतर न्यायालयात हजर करणे, एटीएस कोठडीसाठी युक्तिवाद तसेच संशयितांच्या प्रकृती संदर्भातील व अन्य अर्जांवर सुनावणी झाली होती, असे ॲड. मिसर यांनी सांगितले. घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तुंचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल प्रलंबित होते. एटीएसचे तत्कालीन प्रमुख दिवंगत हेमंत करकरे आणि तपास अधिकारी कुलकर्णी यांच्यामार्फत तपास सुरू होता. नंतर हा खटला मुंबईतील विशेष न्यायालयाकडे वर्ग झाल्याचे मिसर यांनी नमूद केले.

न्यायालयाबाहेर आंदोलने…पोलीस बंदोबस्त

दहशतवाद विरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंग यांना या प्रकरणात अटक केल्यानंतर नाशिक येथील जिल्हा न्यायालयात हजर केले होते. तेव्हा एकसंघ शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्या होत्या. न्यायालयाबाहेर संबंधितांनी या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलनेही केली होती. या खटल्याच्या सुनावणीवेळी पोलिसांना न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत असे. साध्वी प्रज्ञासिंग यांना एकदा पकृती अस्वास्थ्यामुळे पंचवटीतील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे सांगण्यात येते.