मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतील भंगार वाहनांची विक्री करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी ३८ इच्छुकांनी तयारी दर्शविली. शेवटच्या क्षणी मात्र प्रत्यक्षात तीनच जणांनी बोली लावण्यासाठी बंद लिफाफा सादर केला. यामुळे या लिलाव प्रक्रियेबद्दल संशय निर्माण केला गेल्याने तसेच तक्रारी सुरू झाल्याने ही लिलाव प्रक्रिया वादात सापडली आहे. त्यामुळे प्रशासनाने भंगार वाहने विक्रीसाठी फेर लिलावाची प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या ३६ जुन्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले गेले होते. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांचे मूल्यांकन करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र यातील बरीच वाहने हे जुनी असल्याने व आजच्या घडीला त्यांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांचे मूल्यांकन करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अखेरीस ज्या स्थितीत ही वाहने आहेत,त्यानुसार परिवहन विभागाकडून मूल्यांकन केले गेल्यानंतर महापालिकेतर्फे लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी बंद लिफाफ्यात इच्छुकांकडून बोली मागवण्यात आली.
या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी एक हजार ४९९ रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले होते. तसेच पाच हजार २०० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली होती. त्यानुसार विहित मुदतीत ३८ जणांनी अर्ज नेले होते. तर २४ जणांनी अनामत रक्कम देखील जमा केली. मात्र २९ सप्टेंबरपर्यंत बंद लिफाफ्यात बोली सादर करण्याच्या विहित मुदतीपर्यंत केवळ तीनच जणांनी बंद लिफाफे सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला उत्साह दाखवणाऱ्या इच्छुकांचा उत्साह नंतर अचानक मावळला कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
माजी आमदार आसिफ शेख यांनी यासंदर्भात तक्रार करत ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची आणि फेर निविदा मागवावी,अशी मागणी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. विशिष्ट इच्छुकांना ही भंगार वाहने कमी दरात खरेदी करता यावीत, म्हणून अन्य इच्छुकांना बोलीसाठीचे बंद लिफाफे सादर करण्यापासून परावृत्त करण्यात आले. तसेच त्यासाठी एका माजी नगरसेवकाने दबाव तंत्राचा वापर केला, असा आरोप शेख यांनी या पत्रात केला आहे. या लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून त्यात महापालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावाही शेख यांनी केला.
किमान तीन जणांनी बोली लावणारे बंद लिफाफे सादर केल्यामुळे महापालिकेने नियमानुसार पुढील प्रक्रिया सुरू करण्याचे निश्चित केले होते. मात्र शेख यांनी आक्षेप घेतल्यानंतर ही प्रक्रिया नव्याने राबविण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू झाल्या आहेत.