मालेगाव : उत्तराखंडमधील उत्तरकाशी भागात ढगफुटीची आपत्ती कोसळल्यानंतर देवदर्शनासाठी तेथे गेलेले मालेगावातील सात यात्रेकरु अडकून पडली आहेत. गेली दोन दिवस त्यांचा संपर्क तुटल्याने त्यांचे नातेवाईक काळजीत पडले होते. सुदैवाने गंगोत्री येथे ते सर्व सुखरूप असल्याचा दूरध्वनी गुरुवारी सायंकाळी येथे आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बांधकाम व्यावसायिक सुरेश येवले, त्यांची पत्नी नयना व मुलगा अनिकेत आणि दीपक कोतकर, त्यांची पत्नी शुभांगी, मुलगे शौनक व शर्विल हे येवले व कोतकर कुटुंबातील सात सदस्य शुभयात्री ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून चारधाम यात्रेसाठी गेल्या एक ऑगस्ट रोजी नाशिकहून रेल्वेने निघाले होते. मंगळवारी सकाळी दर्शन झाल्यानंतर १२ वाजेच्या सुमारास हे यात्रेकरू गंगोत्रीहून उत्तर काशीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दुर्घटनेत अनेक यात्रेकरु अडकून पडले तसेच त्यांचा संपर्क देखील तुटला. यात येवले व कोतकर या दोन्ही कुटुंबातील यात्रेकरूंचा समावेश आहे.
गंगोत्री येथे दर्शन आटोपल्यावर मंगळवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास समाज माध्यमाद्वारे या यात्रेकरूंनी मालेगावमधील नातेवाईकांशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. दुर्घटनेची माहिती समजल्यावर येवले यांचे पुतणे गौरव यांनी प्रवासी कंपनीशी संपर्क साधून यात्रेकरूंची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन चालकाशी संपर्क होत नसल्याची माहिती कंपनीकडून दिली गेल्याने नातेवाईकांची धाकधूक आणखी वाढली होती.
या यात्रेकरूंचे भ्रमणध्वनी बंद असले तरी कुणाच्यातरी भ्रमणध्वनीवरुन ते मालेगावला संपर्क साधतील या प्रतीक्षेत सर्व नातेवाईक मंडळी होती. त्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास येवले यांचा मुलगा अनिकेत याने गंगोत्रीमधील एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरून चुलत भाऊ गौरव याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. एका हॉटेलात आम्ही सुखरूप असल्याची बातमी त्याने दिली अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला. उर्वरित यात्रा रद्द करून हे सर्व जण आता एक, दोन दिवसात मालेगावला विमानाने परत येतील, अशी माहिती गौरव येवले याने दिली आहे.