मालेगाव : पाचशे रुपयांच्या दहा लाखाच्या नकली नोटा चलनात आणण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला जाण्याची घटना चार दिवसांपूर्वी मालेगावात घडली होती. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे आणि यात मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे पोलीस तपासात आता समोर येत आहे. यापूर्वी मालेगावात बनावट नोटा घेऊन येणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याप्रकरणी आता मालेगावातील आणखी एकाला पोलिसांनी अटक केली असून दिवाळीच्या काळात त्याने शहर व परिसरात नकली नोटा चलनात आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.

नकली नोटा विक्री करण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत नाजीर आक्रमक मोहम्मद अयुब अन्सारी (३४) व मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३) या दोघांना पकडण्यात आले. झडती घेतल्यावर त्यांच्याकडे बॅगेत व खिशामध्ये ठेवलेल्या पाचशे रुपयांच्या दोन हजार बनावट नोटा आढळून आल्या होत्या. दहा लाखांच्या या बनावट नोटा चलनात आणण्याचा संशयितांनी प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. न्यायालयाने दोघांची ८ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. पकडण्यात आलेले दोघेही संशयीत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. यातील मोहम्मद अश्रफ हा मौलाना आहे.

या बनावट नोटा कोणाच्या माध्यमातून चलनात आणण्यासाठी संशयीतांचा प्रयत्न होता, या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केल्यावर मालेगावातील तौसिफ अंजुम अन्सारी (३६) याचे नाव पुढे आले. ऐन दिवाळीच्या काळात तौसिफ यास पाचशे रुपयांच्या सहा लाखांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी विक्री करण्यात आल्या होत्या,अशी माहिती संशयीतांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी तौसिफ यास अटक केली आहे. या बनावट नोटा त्याने कशाप्रकारे चलनात आणल्या तसेच या गोरख धंद्यात आणखी कोण कोण गुंतले आहे, या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.

मौलानाचे कारनामे…

अटक करण्यात आलेला मोहम्मद जुबेर हा मौलाना आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील तो रहिवाशी आहे. तीन महिन्यांपूर्वीच खंडवा जिल्ह्याच्या पैठिया गावातील मशिदीत इनाम म्हणून तो नियुक्त झाला होता. तेथील मदरशामध्ये तो मुलांना धार्मिक शिक्षणही देत होता. त्याच ठिकाणी त्याच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळी कारणे देऊन तो १७ दिवस बाहेरगावी गेला होता. बनावट नोटांप्रकरणी मालेगाव पोलिसांनी दोघांना अटक केल्याची बातमी पैठिया परिसरात वायरल झाल्यावर या मौलानाचे कारनामे स्थानिकांच्या समोर आले. मालेगाव पोलीस व स्थानिकांनी जावर पोलिसांना याप्रकरणी माहिती दिल्यावर मध्य प्रदेश पोलिसांनी मौलानाच्या घराची झडती घेतली असता पाचशे रुपयांच्या १९ लाख ७८ हजारांच्या बनावट नोटा आढळून आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर, निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सावंजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.