मालेगाव : महापालिकेच्या कारभारात गतिमानता यावी, नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा मिळावी, म्हणून महापालिकेतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये अशाप्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारी आणि त्यासाठी प्रशिक्षण देणारी मालेगाव महापालिका ही जिल्ह्यातील पहिली संस्था ठरली आहे.
महानगरपालिकेच्या ई-प्रशासन विभागाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील ‘एईडब्ल्लूएस’ या संस्थेने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासकीय कामकाजात वापर’ या विषयावर प्रशिक्षण दिले. पहिल्या दिवशी दोन सत्रात तर दुसऱ्या दिवशी एका सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा व त्याचे होणारे फायदे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या परिवर्तन कार्यक्रमांतर्गत बुद्धीमत्तेचा वापर करुन पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांना उत्तम व कमीतकमी वेळेत नागरी सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी केले. प्रशासकीय कामकाज करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक व योग्य पद्धतीने वापर करावा, कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानव नसून यंत्र आहे, याचे भान ठेवून त्यावर जास्त अवलंबून न रहाता स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असेही जाधव यांनी याप्रसंगी नमूद केले.
कार्यशाळेत अतिरीक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त गणेश शिंदे, हेमलता डगळे, पल्लवी शिरसाठ, डॉ.सुनिता कुमावत, मुख्य लेखा परीक्षक शबाना शाह, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गजानन पाटील, लेखा परीक्षक शेखर वैद्य, सहायक आयुक्त राजू खैरनार, अनिल पारखे, तौसिफ शेख, शहर अभियंता कैलास बच्छाव आदी उपस्थित होते.