मालेगाव महापालिका निवडणूक
विद्यमान नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी न देण्याच्या किंवा हात आखडता ठेवणे, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी तर दुसऱ्या बाजूला केंद्रात व राज्यात सत्तास्थानी भाजपच्या चलतीवर स्वार होण्यासाठीचा वाढता कल यासारख्या कारणांमुळे मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षांतराचे पीक चांगलेच बहरल्याचे दिसून येत आहे. शंभरपेक्षा जास्त आजी-माजी नगरसेवक किंवा त्यांचे निकटचे नातेवाईकांनी पक्षनिष्ठा गुंडाळत दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला आहे तर काहींनी स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी बंडखोरीचा मार्ग अनुसरल्याचे चित्र आहे.
गेल्या वेळी शिवसेनेचे अकरा उमेदवार विजयी झाले होते. नंतर रवींद्र पवार यांच्या रूपाने एक अपक्ष नगरसेवक जाऊन मिळाल्याने सेनेचे पालिकेतील संख्याबळ बारापर्यंत पोहोचले होते. या बारापैकी एकाही नगरसेवकाला सेनेने पुन्हा उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सेनेची नगरसेवक मंडळी नाराज झाली. पक्षात मोठी बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही विद्यमान नगरसेवकांना डावलल्याने तसेच इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी इतर पक्षाचा आधार घेतला आहे. पालिकेत तिसरा महाज या मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या पक्षातही फूट पडली असून त्यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी बंडाचा झंडा फडकावला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपमध्ये दाखल झालेले नगरसेवक गुलाब पगारे हे तेथून घोडके यांना टक्कर देत आहेत.
पालिकेत तिसरा महाज या मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या पक्षाचे पालिकेतील गटनेते व माजी महापौर नरेंद्र सोनवणे हे चक्कभाजपकडून लढत आहेत. तिसरा महाजचे नगरसेवक असलेले व नंतर राष्ट्रवादीत गेलेले एजाज उमर, नजीर भाई, नुरजहाँ मोहंमद मुस्तफा, युसूफ अब्दुल कादीर, मोहमद सुलतान आदी नगरसेवक आता काँग्रेसकडून उमेदवारी करीत आहेत.
आई नगरसेविका असलेले जनता दलाचे फारूक शहा व शेख इब्राहिम हे आता अनुक्रमे सेना व भाजपकडून उभे आहेत तर गेल्या वेळी जनराज्य आघाडीकडून लढणारे नगरसेवक प्रा. रिजवान खान हे काँग्रेसकडून लढत आहेत.
राष्ट्रवादीचे बंडखोर एमआयएमकडे
राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दलाने या निवडणुकीत युती केली आहे. २४ पैकी केवळ आठ नगरसेवकांना राष्ट्रवादीने पुन्हा संधी दिली आहे. युतीत मित्र पक्षाला दहा जागा देतांना तसेच काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या धोरणामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळू न शकलेल्या बहुतेकांनी एमआयएमचा रस्ता धरला आहे. त्यामुळे आधी जेमतेम वीस जागा लढविण्याची इच्छा असणाऱ्या एमआयएमला तब्बल ३५ ठिकाणी उमेदवार लाभले आहेत. राष्ट्रवादीच्या मंगला भामरे याही काँग्रेसकडून लढत आहेत.
शिवसेनेत प्रचंड नाराजी
शिवसेनेच्या काहींनी भाजपचे कमळ फुलविण्याचा इरादा जाहीर केला तर काहींनी सेनेला आव्हान देत थेट बंडखोरी केली आहे. गेल्या वेळी काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले नगरसेवक मनोज पवार यांचे प्रभागात चांगले प्राबल्य आहे. या वेळी नऊ क्रमांकाच्या प्रभागातून पत्नी ज्योती यांच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील होते. मात्र सेनेने त्यांची मागणी धुडकावून लावत मुक्ता टिळेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पवार यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत पत्नी ज्योती यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले आहे. याच प्रभागातून नगरसेविका विजया काळे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत भाजपची उमेदवारी घेतली आहे. हाडाचे शिवसैनिक असलेले जगदीश गोऱ्हे यांनी भाजपची पताका हाती घेत पत्नी अर्चना यांना प्रभाग एकमधून उमेदवारी मिळवली. सेना नगरसेवक मीना काकळीज, रवींद्र पवार व त्यांच्या पत्नी जयश्री याही अपक्ष लढत आहेत. प्रभाग आठमधून पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले सेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास तिसगे यांची इच्छा पूर्णत्वास न आल्याने त्यांनी पत्नी कोकिळा यांना अपक्ष उभे केले. तेथे महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी यांची पत्नी सुनीता यांना सेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली. या शिवाय जितेंद्र देसले, प्रकाश भडांगे, तात्या महाले आदी शिवसैनिकांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. स्वपक्षीय नगरसेवकांना नाकारणाऱ्या सेनेने जुने काँग्रेसी, माजी उपमहापौर व सध्या शहर विकास आघाडीच्या कोटय़ातून स्वीकृत सदस्य असलेले सखाराम घोडके यांना मात्र उमेदवारीसाठी पायघडय़ा घातल्याचे दिसते. गेल्या वेळी अपक्ष लढताना पराभूत झालेल्या घोडके यांना सेनेने आठ क्रमांकाच्या प्रभागात उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसमध्ये कमी बंडखोरी
अन्य पक्षांच्या तुलनेत काँग्रेसमध्ये मात्र कमी बंडखोरी झाल्याचे दिसते. काँग्रेसने २४ पैकी १३ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर केवळ दोघांनी बंडखोरी केली. सजिराबी नबी शाह या आता राष्ट्रवादीकडून तर पत्नी काँग्रेस नगरसेविका असलेले युसूफ भुरी खान हे अपक्ष लढत आहेत.