मालेगाव : मालेगाव तालुका पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ‘सेम टू सेम’ दिसणाऱ्या पाचशे रुपयांच्या दहा लाखाच्या नकली नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला गेला आहे. या प्रकरणात दोन परप्रांतीयांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील एक जण मौलाना असून मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचा बुरखा पांघरून तोही या गोरख धंद्यात सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
नकली नोटा विक्री करून त्या चलनात आणण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ येणार असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने संबंधित हॉटेल परिसरात वावर असणाऱ्या सर्वच व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. या दरम्यान दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना हटकल्यावर त्यांची घाबरगुंडी उडाली. नंतर त्यांची झडती घेतली असता बॅगेत ठेवलेल्या पाचशे रुपयांच्या दोन हजार नोटा आढळून आल्या. प्रथमदर्शनी हुबेहूब वाटणाऱ्या या नोटांचे पोलिसांनी बारकाईने निरीक्षण केले. या नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व सुरक्षा धागा तपासल्यावर त्या नकली असल्याची खात्री पोलिसांची पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
नाजीर आक्रमक मोहम्मद अयुब अन्सारी (३४) व मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (३३) अशी या संशयीतांची नावे असून दोघेही मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी आहेत. यातील मोहम्मद अश्रफ हा मौलाना असून मध्यप्रदेशातील मदरशामध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम तो करत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या ताब्यातील बनावट नोटा,दोन मोबाईल संच व बॅग असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना लागलीच अटक करण्यात आली. न्यायालयात उभे केले असता दोघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरच्या नकली नोटांची छपाई कुठे व कुणी केली, संशयीतांकडे या नोटा कशा आल्या व त्या कुणाला विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, या अनुषंगाने पोलीस तपास जारी आहे. तसेच या गोरख धंद्यात आणखी कोण कोण व्यक्ती सहभागी आहेत,याचाही पोलीस शोध घेत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सावंजी, उपनिरीक्षक तुषार भदाने, पोलीस हवालदार अमोल शिंदे, प्रकाश बनकर, गणेश जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक भदाणे हे करीत आहेत.
अवैध व्यवसायांचे उच्चाटन, गुन्हेगारीस प्रतिबंध व अवैध तस्करी रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यात पोलीस ठाणेनिहाय धडक कारवाई सध्या सुरू आहे. त्याच अनुषंगाने मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे वेळीच सतर्कता दाखवून कारवाई केल्याने नकली नोटा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही परप्रांतीयांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
