मालेगाव : शहराच्या दरेगाव भागातील सहा वर्षीय बालकाचे पैशांचे आमिष दाखवून एका परप्रांतीय कामगाराकडून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु,नागरिकांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अपहरणाचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. सजग नागरिकांनी अपहृत बालकाला सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन केले आणि संशयिताला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणामुळे पालक वर्गात घबराट निर्माण झाली आहे.
मोमीन तालीफ मोमीन तौसिफ (६) असे अपहृत बालकाचे नाव आहे. दरेगावच्या गुलाब पार्क भागात तो खेळत असताना एक अनोळखी इसम तेथे आला. त्याने पैशाचे आमिष दाखवत तालीफ यास एका ऑटो रिक्षात बसवले. ही रिक्षा राष्ट्रीय महामार्गावरील स्टार हॉटेलकडे जात असताना रिक्षात बसलेली व्यक्ती लहान बालकाला मारहाण करीत असल्याची दृश्य तेथील काही व्यावसायिकांच्या निदर्शनास आले. त्याबद्दल शंका आल्याने या व्यवसायिकांनी रिक्षा थांबवली. संबंधित व्यक्तीला विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आल्याने संशय अधिक बळावला. या बालकाकडे विचारणा केल्यावर त्याने घडलेला प्रकार कथन केला.
या बालकाकडून मिळालेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून व्यावसायिकांनी त्याचे वडिल मोमीन तौसिफ जलील इकबाल यांना घडलेल्या घटनेची कल्पना दिली. तसेच पोलिसांनाही कळविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या मोमीन तौसिफ यांच्याकडे तालीफ यास सुखरूप सुपूर्द करण्यात आले. तर अपहरण करणाऱ्या तरुणास पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
सलीम मुन्ना आलम (३०) असे बालकाचे अपहरण करणाऱ्या संशयीत तरुणाचे नाव निष्पन्न झाले. तो गुजरातमधील अंकलेश्वरचा रहिवाशी असून मालेगावतील एका कंपनीत तो कामास आहे. याप्रकरणी मोमीन तौसिफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सलीम याच्या विरोधात पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक पवन सुपनर हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, संशयीत सलीम याने बालकाचे अपहरण करण्यामागील कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत.
ओळखपत्रांविना वास्तव्य…
यंत्रमाग व अन्य उद्योगांमध्ये सहज काम मिळते म्हणून अन्य शहरांमधून मोठ्या प्रमाणावर कामगार मालेगाव शहरात कामासाठी येत असतात. अनेकदा त्यांच्या ओळखीचा पुरावा घेण्याची तसदी उद्योगांचे मालक घेत नाहीत. त्यामुळे परक्या शहरांमध्ये गुन्हा करून आलेल्या संशयीतांना मालेगावात एक प्रकारे आश्रय उपलब्ध होत असतो. मध्यंतरी उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या एका संशयीताने अशाच प्रकारे शहरात वास्तव्य केल्याचे आढळून आले होते. गुन्हेगारीला आमंत्रण देणारा हा प्रकार थांबविण्यासाठी संबंधित उद्योजकांनी ओळख पटविल्याशिवाय कामगारांना कामावर ठेवू नये, असा सूर जागरूक नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
