नाशिक – तालुका स्तरावर देखील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग आणि इतर संबंधित विभागांनी रानभाजी प्रदर्शन आणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्रांना जागा व दालने उपलब्ध करून द्यावीत, आपल्या शेतमालाला प्रतवारी व मूल्यवर्धन करून शहरी ग्राहकांना आकर्षित करावे, असे आवाहन क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांनी केले.
नैसर्गिक, पौष्टीक आणि औषधी गुणधर्माच्या रानभाजी महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्राचे उदघाटन रविवारी येथे क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोकाटे यांना ते कृषिमंत्री असताना आमंत्रण देण्यात आले होते, अशी चर्चा आहे. यादरम्यान त्यांचे कृषिमंत्रीपद गेले आणि त्यांच्याकडे क्रीडा खाते आले. त्यामुळे क्रीडामंत्री कोकाटे यांची या कार्यक्रमास उपस्थिती राहिली. कृषिमंत्रीपद गेल्यानंतरही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार कोकाटे कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांसह इतर उपस्थित होते. भुसे यांनी, विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित उत्पादन घेऊन थेट ग्राहकांपर्यंत चांगल्या प्रतीचा, दर्जेदार शेतमाल चांगल्या भावात विकला कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.
शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी उंटवाडी रस्त्यावरील संभाजी चौकात असलेल्या रामेति आवारात सुरु राहणार आहे. सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत यानिमित्ताने करण्यात आले. रानभाजी महोत्सवात जिल्ह्यातील करवंदे, गुळवेल, कडुकंद, चाईचा मोहोर, सुरण आदी भाज्यांसह पालेभाज्यांमध्ये तांदुळका, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुर्डू, घोळ, आळू, खुरसणी , तोंडली आदी भाज्या हाेत्या. ग्राहकांनी विक्रेत्यांकडून भाजीचे महत्व समजून घेतले. काहींनी त्याची पाककृतीही विचारली.