मनमाड : राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड आगाराची मनमाड-पुणे ही बस येथून मार्गस्थ झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात येवला बस स्थानकात बंद पडली. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती पुढे जाऊ शकणार नाही, असे चालक, वाहकाने सांगितल्याने या लांब पल्ल्याच्या या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. वैजापूरहून आलेल्या बसमध्ये या प्रवाशांना बसवण्यात आले. परंतु, आरक्षणधारकांसह अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागला. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

मनमाड आगाराची मनमाड -पुणे नियमित धावणारी बस बुधवारी पहाटे सव्वापाच वाजता स्थानकातून निघाली आणि ५.४५ वाजता येवला बस स्थानकात पोहोचली. या ठिकाणी ती बंद पडली. चालकाने बराच प्रयत्न केला. पण तांत्रिक बिघाड झाल्याने बस पुढे जाऊ शकली नाही, त्यामुळे या गाडीने कोपरगाव- शिड, अहिल्यानगर, शिरूर पुणे पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मागाहून आलेल्या वैजापूर -पुणे या गाडीमध्ये मनमाड बसमधील प्रवाशांना वाहकाने बसवून दिले. मुळातच ही गाडी वैजापूर येथूनच प्रवाशांनी भरून आली होती. त्यात मनमाड बसच्या नादुरुस्त गाडीतील प्रवाशांची भर पडली. अनेकांना जागाही मिळू शकली नाही. जेष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांचे हाल झाले.

येवला येथून काही प्रवाशांनी येवला-पुणे असे आरक्षण देखील केले होते त्यांना देखील उभ्याने प्रवास करावा लागला. शिवाय गाडीला पोहोचण्यासही बराच विलंब झाला त्यामुळे बसमधील प्रवाशांना आणि थेट पुण्यापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मनमाड, डेपोच्या मनमाड -पुणे बसला मोठे भारमान आहे.

मनमाडसह येवला, कोपरगाव, शिर्डी येथून थेट पुण्यापर्यंत जाण्यासाठी प्रवासी या गाडीला पसंती देतात. मनमाड आगाराला पाच नवीन बसेस मिळाल्या आहेत. या घटनाक्रमानंतर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी त्यांचा उपयोग प्रशासनाने करावा, अशी मागणी होत आहे. बसच्या बिघाडाने बराच वेळ गेला. वेळेत पुणे गाठता आले नाही. अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले. मनमाड व आगाराच्या काही बसेस मध्येच तांत्रिक बिघाडाने बंद पडून प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आलेल्या आहेत. याबाबत राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.